Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिसेस फॉसेट
३३
 


 फॉसेट्बाई पुढे जाऊन गर्जू लागल्या कीं, "नवरा-बायकोचें नातें कसें असावें; आमची वैवाहिक नीति कशी असावी; घटस्फोट व्हावे कीं नाहीत; घटस्फोटित स्त्रियांच्या मुलांची वासलात कशी लावावी, याचे सारे कायदे तुम्हीं पुरुष करतां; आणि ते पाळण्याची जबाबदारी आमच्यावर लादतां. कायदे करतांना, तुम्हीं पुरुषांच्या बाजूनें पक्षपात करतां; आम्हां स्त्रियांना अन्याय करतां. पत्नी कितीही चांगली असो, तिच्या बदमाश नवऱ्याला कायदा संभाळून धरतो; आणि सुशील पत्नीच्या जीविताचें पोतेरें करून सोडतो. सुशील घटस्फोटित आईचीं मुलें तुमचा कायदा अतिशय दुराचारी आणि नाठाळ बापाच्या हवाली करतो. बरें, आई आणि बाप दोघेही दुराचारीं असली, तर शिक्षेचा तडाखा स्त्रीला जितका बसतो तितका पुरुषाला बसत नाहीं. खरे पाहतां, शिक्षा सोसण्याचे सामर्थ्य पुरुषांना जितकें असतें, तितकें बायकांना असत नाहीं; पण असे असूनही आणि स्त्री-पुरुषांचा दोष सारखा असला तरी शिक्षेचा ससेमिरा तुम्हीं बायकांच्या मागें जास्त लावतां."
 १८७१ साली पार्लमेन्टमध्ये 'स्त्रियांना होणाऱ्या अन्यायाचें परिमार्जन' या नांवाचें एक विधेयक पुढें आलें होतें. या बिलावर बोलतांना इंग्लंडचा मुख्य प्रधान ग्लॅडस्टन हा म्हणाला की, 'आपल्या या घटस्फोटाच्या कायद्यानें स्त्रियांच्या विरुद्ध एक नवें आणि अघोरी वैषम्य उत्पन्न केलें आहे. या बिलाने पुरुषांचा पक्षपात केलेला आहे; वैवाहिक जीवनांत जर स्त्रीच्या हातून कांहीं प्रमाद घडला, तर आपला कायदा तिचा सारखा छळ करीत सुटतो; पण पुरुषाच्या हातून जर चूक झालेली असली, तर तो त्याला संभाळून धरतो.' इतकें बोलून ग्लॅडस्टने असा दावा मांडला कीं, 'आपल्या राजकारणावर स्त्रियांच्या मताचा दाब पडल्याशिवाय स्त्रियांचें हें गाऱ्हाणें कधींही मिटावयाचें नाहीं' याचा अर्थ असा कीं, फॉसेट्बाईनीं चालू केलेली ही चळवळ ग्लॅडस्टन सारख्या मुत्सद्याला पसंत पडूं लागली होती.
 याच प्रसंगी आणखी एक उपकारक गोष्ट घडून आली. बायकांना मतदानाचा हक्क असावा, हें अनेक पुरुषप्रतिनिधींना मान्य नव्हते. परंतु ते संभवितपणानें गप्प बसत. एक सभासद मात्र संतापानें अगदीं बेहोष होऊन गेला; आणि भर पार्लमेन्टांत बायकांच्या विरुद्ध भलभलतें बोलूं लागला. तें त्याचें भरमसाट भाषण ऐकून, या चळवळीला कांहींसें विरुद्ध असलेले लोक मतदानाचा हक्क देण्याच्या