Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
कर्तबगार स्त्रिया
 


बसली. १८९० सालच्या या परीक्षेत फिलिपा ही पहिली आली. सर्व पुरुष विद्यार्थ्यांना मागे टाकून या पोरीनें गणितासारख्या अवघड विषयांत पहिला क्रमांक मिळवलेला पाहून इंग्लंडच्या स्त्रियांच्या आनंदाला मात्र असें कांहीं विलक्षण भरतें आलें, कीं फिलिपा हिच्या विजयाचा डंका त्यांनीं महिनोन् महिनें अखंड चालू ठेवला.
 पण सर्वच पुरुष कांहीं इतके अनुदार नव्हते. अनेक तरुण लोकांनीं एक मोठी मिरवणूक काढली; आणि फॉसेट्च्या घरापाशीं आल्यानंतर 'फिलिपा सिनीयर रँगलर,' 'फिलिपा सिनीयर रँगलर,' म्हणून त्यांनीं गर्जना केल्या. आईला आणि लेकीला पराकाष्ठेचा आनंद झाला असेल, हें सांगावयास हवे काय? पण या आनंदानें त्यांची डोकीं मात्र भडकलीं नाहींत, आपण कोणी मुलखानिराळ्या स्त्रिया आहों, अशी समजूत त्यांनी करून घेतली नाहीं. आईनें आपल्यावर केवढे उपकार केले आहेत, हें फिलिपा हिला चांगले माहीत होतें. म्हणून फॉसेट्बाईनी चालवलेल्या स्त्रीशिक्षणाच्या पुरस्काराचें काम तिनेंही अधिक जोरानें चालू केलें.
 मागे सांगितलेच आहे कीं, प्रो. फॉसेट् यांच्या संगतीत बाईंना अर्थशास्त्राची गोडी लागली. आंधळे होते तरी फॉसेट् हे आपला प्रोफेसरीचा धंदा करीत. त्यांना वाचून दाखवण्याचे काम बाईना रोज करावें लागे. दोघांनीं चर्चा करावी; ती बाईंनी लिहून काढावी, असें होतां होतां, 'निबंध आणि व्याख्यानें' या नांवाचें एक पुस्तक बाईंनीं प्रसिद्ध केलें. १८७० त अर्थशास्रावरच त्यांनीं एक पुस्तक लिहिले. या अर्थशास्त्राच्या विचारांतूनच स्त्रियांच्या हक्कांचा प्रश्न बाईंच्या मनावर ठसूं लागला.
 मिसेस फॉसेट् म्हणूं लागल्या कीं, 'जे कायदेकानू आम्ही पाळावे अशी अपेक्षा सरकार ठेवतें, ते कायदे-कानू बनवण्याच्या कामांत जर आमचा हात आला, तरच ते पाळण्याला आम्हीं बांधलेल्या आहों. पुरुषांनी एकत्र जमावयाचें; आणि आम्हांला कळू न देतां कायदे पसार करून ते आमच्या माथीं मारावयाचे, ही गोष्ट अतःपरः चालावयाची नाहीं. पुरुषांप्रमाणेंच आम्हांलाही मतदानाचा हक्क हवा. तो मिळाला, म्हणजे आमच्या बाबतींत तुम्हीं कसले कायदे करतां, हें आम्हीं पाहून घेऊं.'