Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिसेस फॉसेट
२७
 


अगदीं बारीक सारीक वर्णन त्याच्यापुढें केलें, तर तो तें वर्णन नीट ध्यानांत ठेवून या नव्या सडकेवर सुद्धां फिरायला जाई. घोड्यावर बसण्यांत तो मुळचा फार पटाईत होता. अंधत्व आल्यावरही त्यानें घोड्यावरची रपेट कधींच सोडली नाहीं. मासे पकडण्याचा त्याचा मूळचा छंद त्यानें पुढें तसाच चालू ठेवला. केंब्रिज येथें तो अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता; आणि इंग्लंडच्या लोकसभेचाही तो एक प्रतिनिधि होता. अशा माणसाची आणि गॅरेट यांच्या मुलीची सहजासहजी गांठ पडली.
 मिलिसंट गॅरेट् हिच्याकडे या अंधाचें लक्ष विशेष गेलें होतें. मिलिसंट ही फार देखणी मुलगी होती. तिचे मनोधर्म कांहीं निराळेच होते. फॉसेटचे शरीर-वैभव तिला अतिशय आकर्षक वाटले, आणि असा उमदा माणूस जर दुर्दैवानें एकाद्या आपत्तींत सांपडलेला असला, तर त्याला साहाय्य करून आपण त्याचें जीवित सुखाचें करावें, असें या मुलीला वाटू लागलें.
 १८६७ मध्ये प्रो. हेन्री फॉसेट् आणि मिलिसंट गॅरेट् यांचा विवाह झाला. फॉसेट्च्या संगतींत तिला अर्थशास्त्राचें ज्ञान हळू हळू होऊं लागलें; आणि मग पुढें तर या विषयांत तिनें इतकी प्रगति केली, कीं या विषयावरचीं तिचीं पुस्तकें लोक प्रमाण मानूं लागले.
 मिलिसंटनें जेव्हां पुढें स्त्रियांची बाजू घेऊन देशांतील पुरुषांशीं खडा सामना सुरू केला, तेव्हां 'पुरुषांचा द्वेष करणारी,' 'पुरुष जातीची वैरी असलेली,' अशीं तिचीं वर्णनें वृत्तपत्रांत होऊं लागलीं. ती जर खरोखरच पुरुष जातीची वैरी असती, किंवा पुरुषांचा द्वेष तिच्या मनांत बाणलेला असता, तर तिनें असल्या अंध पुरुषाशीं कधींही लग्न लावलें नसतें. उलट एका अंध पुरुषाला प्रपंचबद्ध करून त्याचा संसार तिनें आपल्या नेकीनें सुखाचा केलेला असावा, यांत तिची पुरुष- जातीवरील प्रीति मात्र दिसून येते.
 वडील बहिणीच्या शिक्षणक्रमांत पुरुषांनीं आणि प्रत्यक्ष सरकारने अडथळे आणलेले होते, याचें स्मरण तिला होतेंच होतें. नवऱ्याबरोबर अर्थशास्त्राची चर्चा करतां करता तिला हें कळून चुकलें कीं, स्त्रीला मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याशिवाय तिच्या अंगांतील बुद्धिस्फुरणाचा पोष व्हायचा नाहीं; आणि तो झाला नाहीं, तर मानवी जीवनांत तिचें स्थान अगदीं खालच्या पायरीचें राहील. देशांत जर