Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
कर्तबगार स्त्रिया
 


ठिकाणी घातली. बेवारशीं पोरांना संभाळण्यासाठीं गृहें सुरू केलीं; शाळा, कॉलेजें, दवाखाने यांना तर चलनी नोटा ती पुडक्यावारी देऊं लागली. सहानुभूति, दुःख-परिहार, प्रपंच- विवंचनेचा निरास, वार्धक्याची सोय, दुखणाइतांना औषधोपचार अशा सर्व कामांसाठीं इव्हा सढळ हाताने खर्च करु लागली. अर्थात् जे लोक आतांपर्यंत केवळ 'पेरॉन, पेरॉन' म्हणून ओरडत होते, ते 'पेरॉन-इव्हा' असे ओरडूं लागले.
 घरंदाज आणि श्रीमंत स्त्रियांची ऐट घालविण्यासाठीं इव्हानें आपलाहि इतमाम वाढविला. नेहमींची राहणी तिनें अगदीं बेताची ठेवलेली होती. परंतु सार्वजनिक ठिकाणी किंवा दरबारांत जावयाचें म्हटलें, म्हणजे एकाद्या सम्राज्ञीला सुद्धां हेवा वाटावा, असा पोषाख ती करूं लागली. युरोपांतील मोठमोठ्या राजधानींतील झगेवाल्यांना तिच्याकडून पत्रे येऊं लागलीं, "आजपर्यंत तुम्ही केले नसतील असे उंची झगे करून पाठवा; त्यांना रत्नांच्या आणि मोत्यांच्या झालरी लावा, त्यांवर मधून मधून हिऱ्याचे चांद बसवा." मग असला पोशाख करून प्रेसिडेंट पेरॉनची बायको मोठ्या तोऱ्याने सार्वजनिक प्रसंगांना आणि दरबाराला जाऊं लागली. तिच्याकडे पाहून तिला नाके मुरडणाऱ्या त्या श्रीमंतांच्या आणि खानदानीच्या स्त्रिया अगदीं दिपून जाऊं लागल्या. पण हे प्रसंग सोडले, कीं अंगांत एक साधें पोलकें घालून ही बाई झाडूवाल्यांच्या सभेत जाऊन बसत असे! साऱ्या देशांतील स्त्रिया तिच्याकडे आपली कर्तबगार बहीण म्हणून पाहूं लागल्या. चाळीस लाख मतदार स्त्रियांचें मोठें संघटन तिनें बनविलें; आणि नवऱ्याची पुन्हां निवडणूक आली तेव्हां तिनें त्याच्यावर मतांचा नुसता पाऊस पाडला.
 जॉन पेरॉन हाही स्वतः मोडा उमदा, देखणा आणि पराक्रमी माणूस होता. सत्ता कशी हस्तगत करावी, आणि हुकूमशहांच्या चुका होऊ न देतां, ती हातीं कशी ठेवावी, याचें शास्त्र त्याला चांगलें अवगत होतें. त्यांतच बायकोच्या या साहाय्याची भर पडल्यामुळे पेरॉन अर्जेंटिना देशाचा अनभिषिक्त राजाच बनला. इव्हा तर त्याच्यावर इतकी लुब्ध होती, कीं तारीफ करतांना त्याची तुलना कोणाशीं करावी याचेंहि भान तिला राहीना. ती म्हणें, "आमचे 'हे' शिकंदरापेक्षां मोठे आहेत; नेपोलियनपेक्षां मोठे आहेत; प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताइतके मोठे आहेत." तें कसेंहि असो, पति-पत्नींनी मिळून सारा अर्जेंटिना देश सात आठ वर्षांच्या