कैद केले, आणि एका बेटावर नेऊन ठेवलें. लोकांना वाटलें कीं, पेरॉनचा अवतार संपला.
एक गोष्ट ध्यानांत हवी कीं, पेरॉन हा कामगारांचा पुढारी झालेला होता, आणि सत्तासंपादनासाठीं त्यानें कांहीं जरी केलें, तरी हे लक्षावधि कामगार लोक त्याला सोडावयास बिलकुल कबूल नव्हते. याच वेळीं दुसरा एक चमत्कार घडून आला, आणि त्या चमत्कारानें इव्हा या कुमारिकेचें नांव अर्जेंटिनाभर दुमदुमूं लागलें. आणि जॉन पेरॉन याचें चरित्रच बदलून गेलें.
इव्हा द्वारटी हिचे आईबाप अगदीं गरीब होते. उपासमारीला कंटाळून पोर घरांतून पळाली; आणि ब्यूनो आयरिस या राजधानीच्या गांवीं येऊन नटीचा धंदा करूं लागली. अर्थातच हॉटेलांत जमा होणारी खाबू मंडळी तिच्याभोंवतीं घोटाळूं लागली; आणि कांहींनीं तिची मैत्रीहि संपादन केली. इव्हा ही सुमारे साडे पांच फूट उंच असून थोडी ठाकठिकीनें वागणारी आणि कांहींशीं रंगेल दिसत असे. एके दिवशीं एका खान्याच्या वेळेला आपल्या कर्नल पेरॉनची आणि तिची गांठ पडली. या वेळेपर्यंत तो युद्धमंत्रिमंडळांत दाखल झालेला होता. या दोघांचें तारा मैत्रकच झालें; पेरॉन तिच्यापेक्षां पुष्कळच मोठा होता, पण त्याची पहिली बायको मेली होती. या विधुराचें आणि इव्हाचें प्रेम जमलें; आणि पेरॉन याला सर्व तऱ्हेची मदत आपण केली पाहिजे, असें या पोरीनें ठरविलें.
कामगार लोकांविषयीं पेरॉन याचा जीव जसा तिळतिळ तुटे, तसाच इव्हाचाही तुटत असे. 'दुसरे कोणी श्रीमंत असले तर असले, पण गरीब लोकांचे हाल होतात, हें मात्र मला पहावत नाही,' असें ती म्हणे. अर्थात् गरिबांची कड घेणारा पेरॉन हा कैदेंत पडलेला पाहून इव्हानें त्याला सोडवून आणण्याची युक्ति योजली. पेरॉन हा तुरुंगांत असतांना त्याच्या छातीत दुखूं लागलें. परीक्षा करण्यासाठी राजधानीच्या लष्करी इस्पितळांत त्याला आणण्यांत आलें. इव्हाला वाटलें कीं, पेरॉनला सोडवण्याची ही फार नामी संधि आहे. कामगार मंडळांपुढे ती जोरजोरानें म्हणूं लागली कीं, "तुमचा पुढारी कारागृहांत पिचत आहे, आणि तुम्हीं स्वतःला त्याचे अनुयायी म्हणवितां! त्याच्यासाठीं तुम्ही काय करणार आहां?" आपली गर्दन फुगवून प्रत्येक कामगार ओरडला. "बाई, तूं म्हणशील तें आम्ही करूं." मग दुसऱ्या दिवशीं पन्नास हजार कामगारांचा मोर्चा बरोबर घेऊन इव्हा इस्पितळावर चाल करून गेली. इस्पितळापासून राजवाड्यापर्यंत 'पे-रॉ-न, पे-रॉ-न'
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१११
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इव्हा पेरॉन
१०७