आपल्या कामाला १८५२ साली सुरुवात केली; आणि पुढें १३ वर्षांत अमेरिकेंत एवढें मतान्तर झालें, कीं स्त्रियांना उच्च शिक्षण मिळावें, म्हणून वसार येथें एक मोठें कॉलेज सुरू झालें. पुढील दहा वर्षांत दहा सरकारी युनिव्हर्सिट्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सहशिक्षणाची व्यवस्था करून टाकली. १८८० पर्यंत मुलांना आणि मुलींना एकत्र शिक्षण देणाऱ्या कॉलेजांची संख्या १५४ पर्यंत गेली. हें सारें सुसानच्या प्रचाराचें फळ होय. जेव्हां ती कामाला लागली, तेव्हां कांहीं थोड्याशाच बायांना शाळांत मास्तरणीचीं कामें मिळालीं होतीं. पण पुढील पन्नास वर्षांत म्हणजे १९०० पर्यंत काय चमत्कार घडून आला, तो पहा. एकंदर शाळांतील सर्व शिक्षकांपैकी ६६ टक्के शिक्षक म्हणजे मास्तरणी झाल्या! शिकलेल्या बायका निरनिराळ्या उच्च प्रकारच्या धंद्यांत भरपूर शिरूं लागल्या; आणि यांतूनच अमेरिकन स्त्रीचें दास्यविमोचन झालें असें म्हटलें पाहिजे. गेल्या शतकाच्या शेवटीं शेवटीं विवाहित स्त्रियांवर असलेली गुलामगिरीचीं बंधनें कायद्याने पटापट तोडून टाकली. त्यांनीं धन मिळवावें, स्वतःचें म्हणून ठेवावें, कोणतेहि सांपत्तिक व्यवहार स्वतःचे म्हणून करावे, अशी मुभा त्यांना मिळाली. लग्न म्हणजे बटिकपणा ही व्याख्या गेली; आणि बरोबरीच्या नात्याचा करार असें रूप त्याला प्राप्त झालें. स्त्रीजातीची ही प्रगति पाहून वृद्ध होत चाललेल्या सुसानला पराकाष्ठेचा आनंद होत चालला.
तिचें आतां वयहि झालें; आणि श्रमाश्रमानें तिच्या अंगाची बळकट कांठीसुद्धां काहींशी वाकू लागली. या वृद्धावस्थेत तिनें एकदां युरोपचीं फेरी केली. जेथें जावें तेथें स्त्रियांच्या उद्धाराचा संदेश तिनें सर्व लोकांना दिला. जर्मनींत असतांना विशेष कडक मजकुराचीं पत्रे तिनें आपल्या घरीं लिहिली. परंतु तेव्हांचें जर्मन सरकार असली पत्रे पोस्टांतून पुढें जाऊ देईना. युरोपचा दौरा आवरून सुसानबाई अमेरिकेला परत आल्या. आतां त्यांचें वय शहाऐंशी वर्षांचें झालें होतें. तथापि त्यांचा कामाचा ठोका चालूच होता. सुमारें पन्नास वर्षेपर्यंत सुसानबाई स्त्री-चळवळीच्या आघाडीवर होत्या, चळवळीसाठीं त्यांनी लक्षावधि डॉलर्सचे फंड उभे केले. परंतु स्वतःला अन्नवस्त्रापलिकडे कांहीं घेतलें नाहीं. तिच्या या तपस्येमुळे अमेरिकेच्या महान् कर्त्या माणसांत तिची गणना होऊं लागली. पण मतदानाचा हक्क मात्र ती जिवंत असतांना बायकांना मिळाला नाहीं ती वारल्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे १९२० साली हा हक्क अमेरिकेतील स्त्रियांना मिळाला.
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुसान बी. अंथनी
१०३