Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
कर्तबगार स्त्रिया
 


पुरुषांचेंच राहणार बायका या पुरुषाच्या हाडामांसांतून निघालेल्या म्हणून; त्या त्यांच्या दुय्यमच राहिल्या पाहिजेत. बायबलांतील ही योजना जर बायकांना पटत नसेल, तर आमची अब्रू संभाळण्यासाठीं त्यांना कड्याकुलुपांत कोंडून ठेवणें हेंच आम्हांला प्राप्त आहे." परंतु सुसान आणि तिच्या मैत्रिणी यांनीं हेंहि जुमानलें नाहीं. मोहीम अखंड चालू ठेवून त्यांनीं या पुरुषांचें डोकेंच उठविलें.
 हळू हळू समाजांतील प्रतिष्ठित आणि बुद्धिमान स्त्रिया या चळवळीच्या पाठीराख्या बनल्या. आघाडीला असलेल्या सुसान सारख्या स्त्रिया म्हणू लागल्या कीं, "या सुस्तावलेल्या आणि ऐदी पुरुषांना जोराचे धक्के दिल्याशिवाय हे कधीं जागे होणार नाहीत. चळवळीचा डंका जोरानें गाजावयास हवा. असले रट्टेच यांना दिले पाहिजेत." हें व्हावें म्हणून या बायांनीं आपलें केंस कापून घेतले; आणि त्या गांवांतून बेधडक हिंडूं लागल्या. अंगांत पैरणी घालून त्या सभांना जाऊं लागल्या. पुरुष म्हणाले, "आतां मात्र शर्थ झाली! या बायांना काय वेड लागलें आहे काय? यांनीं चोळ्या टाकल्या, लुगडीं टाकलीं, या विजारी आणि कुडती घालून सैरावैरा धांवत सुटल्या आहेत, याला म्हणावें तरी काय?" सुसानला वगैरे यांतला अतिरेक कळत नव्हता असें नाहीं. पण पुरुषांना धक्के द्यावयास असलेच कांहीं तरी मुलखानिराळें केलें पाहिजे, असें त्यांना वाटत होतें. पुरुषांना गांगरवून सोडल्यावर त्यांनीं आपलें बायकांचे वेष पुन्हां अंगावर घातले. परंतु वेष ताळ्यावर आले, तरी त्यांनीं आपली चळवळ मात्र बिलकुल थांबविली नाहीं.
 स्त्रियांच्या हक्काच्या घोषणा या तिन्ही बायांनीं साऱ्या देशभर उमटविल्या. होता होतां शेवटी स्टॅण्डन आणि रोझ या दमून गेल्या; त्यांच्यानें प्रचाराचें काम होईनासें झालें, आणि सर्व भार एकट्या सुसानवरच पडला. परंतु प्रकृतीनें ही अतिशय खंबीर असल्यानें तिनें हा भार कित्येक वर्षेपर्यंत लीलेनें उचलला. प्रचाराच्या कामी गांवन् गांव टिपावें असें तिला वाटे. जसें एखादें झपाटलेलें माणूस धांवत पळत सुटतें, तशी ही सुसान एका ध्येयानें वेडी होऊन साऱ्या देशभर भ्रमन्ती करीत राहिली. संवयीनें तिला आतां उत्तम बोलतां येऊ लागलें. तिच्या विरोधकांना आतां तिचा जीवित हेतु बरोबर कळून आला. तिच्या बोलण्यांत कांहीं खरें मर्म आहे, हें सर्वांनाच पटून आलें. सुसाननें संग्रह असा कांहीं केलाच नाहीं. ही कुमारी संन्यासिनी ध्येयासाठीं वेडी होऊन आमरण दरिद्रीच राहिली. या तिच्या तपश्चर्येचा योग्य तो परिणाम अमेरिकेंत होऊं लागला. तिनें