Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुसान बी. अंथनी
१०१
 


"या बायकांना हवें आहे तरी काय? पुरुषांच्या साऱ्या जागा त्यांना हव्या आहेत काय? वकील, डॉक्टर, जहाजांचे तांडेल आणि फौजांचें सेनापति आपण व्हावें असे त्यांना वाटतें काय? एकाद्या वकिलीणबाई पक्षकाराची बाजू कोर्टात मांडीत असतांना, दिवस भरलेलें असल्यामुळे त्यांच्या जर पोटांत दुखूं लागलें, तर मग काय करावयाचें? किंवा याची एकादी धर्मोपदेशक बनलेली बाई पीठावरून उपदेश करता करतां जर कां तिला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, तर काय करावयाचें? किंवा एकाद्या डॉक्टरीणबाई एकाद्या पुरुषाचें भगंदर बुजवीत असतांना त्यांनाच जर सुईणीला बोलावणे पाठवावें लागलें, आणि तेथेंच त्याना जुळें झालें, तर काय करावयाचें?" असली चटोर टीका वृत्तपत्रे करूं लागलीं. परंतु या तिघींनीं त्यांना दाद दिली नाहीं. पुरुषांचा जाचच स्त्रियांना इतका तापदायक होता, की या बोलतात हें खरें आहे असें अमेरिकेतील स्त्रीवर्गाला वाटू लागले; आणि कांहीं पुरुषहि त्या बाजूला वळले.
 सुसान इत्यादि बाया बेलाशक सांगूं लागल्या कीं, "महिनोनमहिनें झिंगून पडणाऱ्या नवऱ्यांच्या बायकांना घटस्पोट मिळालाच पाहिजे; पोरबंदीची सवलत तरी त्यांना मिळाली पाहिजे." हे त्यांचे बोलणे ऐकतांच स्टार नांवाच्या पत्रानें लिहिलें, "या बायांचे हे उद्गार ऐकून नरकपुरींतल्या सैतानाच्या दूतांच्या अंगावरसुद्धां शहारे येतील." ज्यांना मनांतून थोडी सहानुभूति होती, ते सुद्धां या बायांचे हे फाडफाड बोलणे ऐकून अगदीं स्तंभित होऊन गेले. एक पत्रकर्ता म्हणाला, "बाईचें आजचें भाषण मोठें नामांकित झालें. पण माझ्या बायकोनें किंवा मुलीनें जर कां असलें भाषण केलें, तर मी त्यांना सागेन कीं, तुम्ही मेलेल्या बऱ्या; पण तुमच्या तोंडून असले शब्द ऐकाययास नकोत."
 होता होतां ही चळवळ कायदेमंडळाच्या दाराशी येऊन ठेपली. स्त्रियांना हक्क मिळाले पाहिजेत, असा अर्ज न्यूयॉर्क येथील कायदेमंडळांत सुसान हिनें आणून गुदरला. तो वाचून राजकारणी लोक अगदीं भडकून गेले. बर्ने हा पुढारी म्हणाला, 'या अर्जीत लिहिलेले हक्क म्हणजे काय आहे? हा सारा मूर्खपणा आहे!! बेशरमपणा आहे!! हा गुन्हाच आहे!!! याला आम्ही थोडीतरी संमति द्यावी असें वाटते काय? अर्जदार म्हणतात कीं, स्त्री-पुरुषांचे हक्क समसमान असावेत. यांच्या जिव्हेला कांहीं हाड आहे काय? परमेश्वरानें पहिल्यानें पुरुष उत्पन्न केला आणि मग त्याच्या बरगडींतील एक फांसळी काढून त्यानें तिची स्त्री बनविली. म्हणजे मस्तक हे