Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
कर्तबगार स्त्रिया
 


 हा प्रकार दुःसह होऊन सुसान अंथनी या दारूच्या चळवळींत पडली. स्त्रियांना मतांचा अधिकार असावा, या चळवळीची तिला अजून कल्पनाहि आली नव्हती. ज्या क्वेकर पंथांत ती जन्माला आलेली होती, तो पंथ मताधिकार आणि मतदान यांची केवळ थट्टाच करीत असे. याचा अर्थ असा कीं, स्त्रियांचें गाऱ्हाणें सरकारच्या दारीं नेऊन पोचविण्याचें खरें साधन जें मताधिकार, त्याचा साक्षात्कार सुसानला अजून झालेलाच नव्हता. पण हा प्रसंग लवकरच घडून आला. दारूची मोहिम सुरू झाल्यावर ती एके दिवशी सभेत बोलावयास उभी राहिली. सभेचा अध्यक्ष तिला एकदम म्हणाला, "बाई, तुम्ही गप्प बसा; बायकांनी केवळ ऐकावें आणि शिकावें; त्यांनी सभेत बिलकुल बोलतां उपयोगाचें नाहीं." अध्यक्षमहाशयांची हीं हरकत पहाताच सुसान अगदीं बेभान होऊन गेली, आणि सभेंतून बाहेर पडली. ती म्हणाली, "बायकांना सभेत बोलण्याचा सुद्धां हक्क नाहीं काय? मग मला आतां हक्कासाठींच झगडले पाहिजे." १८२० सालीं दारूच्या चळवळींतून बाहेर पडून सुसान ही स्त्रियांच्या हक्कासाठीं झगडूं लागली.
 या कामांत एलिझाबेथ कॅडी स्टॅण्डन आणि अर्नेस्टाईन रोझ या दोन बाया आधींच पडलेल्या होत्या. सुसानहि त्यांना जाऊन मिळाली. वास्तविक पाहतां, सामाजिकरीत्या या तिघींच्यांत कसलेच साधर्म्य नव्हतें. एलिझाबेथ स्टॅण्डनचा नवरा एक बडा श्रीमान् वकील होता. रोझहि युरोपांतून अमेरिकेत आलेल्या एका ज्यूची मुलगी होती; आणि सुसान ही एका गरीब क्वेकरची मुलगी होती. पण स्त्रियांच्या हक्कासाठीं चळवळ करणें या कामांत तिघी एक झाल्या. पहिल्या दोघींना सभा गाजविण्याचें चांगले साधलेलें होतें. त्या लिहिण्यांतहि चांगल्या पटाईत होत्या. सुसानला चांगले लिहितांहि येत नसे व चांगलें बोलतांहि येत नसे; पण संघटनेच्या कामांत मात्र तिनें चांगलेंच कौशल्य प्रकट केलें. या त्रयीनें देशांत मोठीच धूम सुरू केली. ठिकठिकाणी जाऊन सभा करणें, गांवोगांवच्या बायकांची उठावणी करून देणें आणि जमेल तेथें तेथें पुरुषांच्या अन्यायाचा परिस्फोट करणें हा उद्योग त्यांनीं चालू केला.
 वृत्तपत्रांनी त्यांची पहिल्यानें उपेक्षाच केली. 'यांची टवाळी आम्ही पत्रांत छापावी तर ती वाचणार कोण?' असें संपादक म्हणत! लवकरच या चळवळीला एवढा जोर चढला, कीं संपादकांना आपले मत बोलून दाखवावें लागलें. स्त्रियांच्या हक्काची ते टवाळीं करूं लागले. 'न्यूयॉर्क हेरल्ड' या पत्राच्या संपादकानें लिहिलें,