Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुसान बी. अंथनी
९९
 


ही गोष्ट पुरुषांच्या पाठांतली होती. 'नवरा रोज जीव घेतो आहे. मला याच्या जांचांतून सोडवा' अशी आरोळी जरी तिनें सरकारच्या दाराशीं ठोकली, तरी कायदा म्हणे कीं, 'तूं नवऱ्याची बायको आहेस, तुला त्याच्याशींच जमवून घेतले पाहिजे.' आपल्या भगिनींच्या या दारुण परिस्थितीकडे पाहून सुसान या शूर पोरीचें मन अक्षरशः विदीर्ण होऊन जाई.
 सुदैवानें सुसानचा बाप डॅनिअल यालाहि ही स्त्रियांची करुणास्पद स्थिति पाहून अतिशय उद्वेग प्राप्त होत असे. त्याच्या हाताखालीं चात्या फिरविणारे जे कामगार होते, ते आपल्या बायकांना मारहाण करीत आणि बायकांनी मिळविलेला पैसा गुत्त्यांत किंवा कुंटणखान्यांत खर्च करीत. हें सारें तो प्रत्यक्ष पहात होता. स्वाभाविकच सुसान जेव्हां भडकून बोलूं लागें, तेव्हां तो तिला स्वच्छ सागें कीं, "तूं म्हणतेस तें सारें खरें आहे. तुम्हां स्त्रियांच्या जीविताची पुरुषांनी आजवर कसलीहि कदर बाळगलेली नाहीं." डॅनिअलला कळून चुकलें होतें कीं, पुरुषांच्या दारुडेपणानें बायकांची केवळ दैना उडून जाते; आणि म्हणून तेव्हां सुरू झालेली दारुबंदीची चळवळ डॅनिअलने उचलून धरली 'आज असें झालें, उद्यां तसें झालें,' अशा अनेक कहाण्या जेवावयाच्या वेळीं डॅनिअल सांगत असे. त्या ऐकून सुसानचें माथेच भडकून गेलें. ती या दारुबंदीच्या चळवळींत आवेशानें पडली. दारूचा प्रसार इतका झाला होता, की झिंगून पडणें किंवा प्रसिद्धपणें बाटल्यावर बाटल्या फोडीत राहणें याची कोणालाच शरम वाटेनाशी झाली होती. एका मोठ्या सन्मान्य गृहस्थाला सार्वजनिक मेजवानी झाली, तेव्हां १२०० लोकांना जेवावयास बोलावलें होतें. प्रसंग खरोखर गंभीर होता. पण अशा वेळीं सुद्धां या लोकांनी दारू प्यावी कां? आणि ती किती प्यावी? बारा दुणें चोवीसशें बाटल्या या लोकांनीं फस्त केल्या! आणि वर ते सांगू लागले कीं, "ही तर नुसती 'भवानी' आहे!" असल्या लोकांच्या घरांत स्त्रियांच्या जीविताचा कोण कोंडमारा होत असेल, याची कल्पना आपल्याला सहज येते. कोणी असें सांगतात कीं, प्युरिटन् लोकांची चळवळ पार एका टोकाला गेल्यामुळे, म्हणजे ज्यानें उठावें त्यानें सात्विक आचाराची कड घेऊन बोलावें, असें झाल्यामुळे केवळ प्रतिक्रिया म्हणून समाजांत दारूचा प्रचार अतोनात झाला; आणि शेवटीं कारखान्यांतल्या हमालापासून तो न्यायमंदिरांतील न्यायमूर्तीपर्यंत सर्व माणसे कामाला लागली, म्हणजे अर्धवट झिंगलेली असत. कारण कोणतेंहि असो, पुरुषांचा समाज बेताल झाला होता, हें कांहीं खोटें नव्हें.