Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
कर्तबगार स्त्रिया
 


हिशेबानें त्या गावंढ्या गांवांतील धूर्तानीं तिला लग्नाची मागणी घातली! पण या फटिंग बाईनें उत्तर केलें, "तुमच्याशी कशाला लग्न करावयाचें? तुम्हांला हक्काची एक बटिक पाहिजे, एवढेच ना?" तिनें त्यांची मागणी फेटाळून लावली. ती म्हणे, "मी चांगली धष्ट-पुष्ट आहे. कुठेंहि चार कष्ट करीन आणि पोटाला मिळवीन. उगाच एकाद्याची बायको बनून त्याचे सारे कष्ट उपशीत बसणें मला नको. मी आपली एकटी राहीन."
 हळू हळू सुसानला वाटू लागले कीं, आपण आपल्या हिंमतीनें जरी स्वातंत्र्य मिळविलें, तरी देशांत ज्या लक्षावधि स्त्रिया आहेत, त्यांच्या दास्याचें काय करावयाचें? त्यांचा वाली कोण? अमेरिका स्वतंत्र झाली असेल; पण अमेरिकन बायका मात्र अजून दास्यांतच खितपत होत्या. सगळ्या जगांत जें होतें व आहे, तेंच तेव्हां अमेरिकेंत होतें. 'बायका म्हणजे कुठल्या झाडाचा पाला!' अशी अवस्था असे. 'पुरुषांच्या हातांतलें पोतेरें म्हणजे बायका' अशी तेथली समजूत होती. बायकांना कसलेहि हक्क किंवा अधिकार नव्हते. त्यांचें सारेंच्या सारें जिणें पुरुषांच्या पायाला बांधलेलें असें. पुरुष जी फरपट काढतील, ती मुकाटयानें सहन करणें, हाच स्त्रीचा धर्म बनला होता. आणि हें सारें कायद्याप्रमाणे होत असे. कायद्याप्रमाणें स्त्री कधीं 'सज्ञान'च होत नसे. लग्न झालें म्हणजे ती नवऱ्याची मत्ता होऊन बसे; आणि जर ती कुमारीच राहिली, तर तिचा जो पुरुष पालक असेल, त्याच्या हवालीं तिचें जिणें होई. लग्न झालेल्या बाईनें श्रम करून कांहीं मिळविलें, तर ती मिळकत तिनें नवऱ्याच्या हवाली केली पाहिजे, अशी सक्ति असे. तिला कामावर ठेवलेल्या माणसानें जर बुडविलें, आणि तिच्या नवऱ्यानें जर त्या माणसाशीं कांहीं रदबदली करून प्रकरण संपविलें, तर या बाईला कांहीं बोलतां येत नसे. इतकेच काय तिला कोणी मारलें किंवा भलतें नांव ठेवलें, तर तिला मिळणारी नुकसान- भरपाई नवऱ्याच्या हातीं जावी, असा कायदा होता. अशा प्रकारें तिच्या जीविताचें सारें गांठोडें नवऱ्याच्या काखेला लावलेलें असे. इतकेंच नव्हें तर स्वतःच्या पोरांवर सुद्धां तिची सत्ता नसे. या पोरांची वाटावाट नवऱ्याला हवी तशी लावतां येत असे. 'माझी पोरें तुम्ही लोकांना कां देऊन टाकतां?' एवढें सुद्वां बायकोला म्हणतां येत नसे. नवऱ्यानें खुशाल झिंगून पडावें किंवा बदफैलीपणाने वागावें; जर कां काडीमोडीचा प्रसंग आला, तर पोरें मात्र नवऱ्याच्या ताब्यांत जात. घरांतल्या कुत्र्यांना जसें झोडपावयाचें, तसें बायकांना झोडपावें