Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
कर्तबगार स्त्रिया
 


केव्हांहि सोडतां कामा नये; आणि या गुणांच्या व्याख्या अर्थातच बाई स्वतः करीत. खास नीति, सद्गुण आणि विनम्रपणा कशाला म्हणावें, आणि चालचलणुकीत थोडासा मोकळेपणा ठेवला तर या साऱ्या गोष्टींना धक्का पोचतो की काय, याचा विचार बाईनीं कधीं केलेला नव्हता. पूर्वजांनी घालून दिलेली ओळ आपण तशीच पुढे चालवावी, एवढाच त्यांचा हिशोब असे. अशा या बाईंना सुसान ही मुलगी बेमर्याद वाटावी, हें अगदीं स्वाभाविक होतें.
 बापाची घरची गरिबीच होती. तथापि नवराबायको आणि सारीं मुलें मिळून प्रपंचाचा गाडा बऱ्या प्रकारें हाकीत असत. आठ भावंडांतील सुसान ही दुसऱ्या नंबरचें भावंड. अर्थात् तिला धाकट्या भावंडाचेंहि बरेंच करावें लागे. बापाचा धंदा सूत कातण्याचा होता. आणि घरांत बऱ्याच चात्या फिरत रहात. त्या चालवावयास काही बाहेरची माणसें रोजंदारीनें येत. पण भाकरीतुकडा यांच्याच घरीं खात. अर्थात् सुसानला आणि तिच्या आईला पुष्कळच काम पडे. प्रसंगाला दहा-दहा, बारा-बारा माणसें जेवावयाची असत. तान्हें पारठें संभाळावयाचें असें. मग करमणूक कुठली? आणि मोठ्या झालेल्या भावंडांना खेळावयाला तरी सवड कुठली? शिवणें-टिपणें, भाकऱ्या थापणें, चिरगुटे धुणे, यांत त्यांचा सारा वेळ जाई. एकट्या सुसानला सुद्धा वीस-वीस भाकऱ्या प्रसंगी भाजाव्या लागत. दमल्या भागल्यानंतर कोठें करमणुकीला जावें, तर बायकांनी घरांतच कोंडून राहिलें पाहिजे, असा तेव्हांचा शिरस्ता होता. चूल आणि मूल यापलिकडे त्यांनी फिरकतां कामा नये, हा दंडक जारीनें चालू होता. देवाला दंडवत घालावें आणि तोंडाला खीळ घालावी ही घरगुती नीति होती. अर्थात् सुसानला यातले काहीहि संमत नव्हतें.
 बापाचा सुताचा कारखाना चालावा तसा चालत नसे. म्हणून सुसानला वाटू लागलें कीं, आपण स्वतः कांहीं कष्ट केले पाहिजेत. तिनें कोठेशीं एक शिकवणी धरली, ती थोडे दिवस चालली. कदाचित् हिचें आणि धन्याचें बनलें नसावें. तिचें बोलणें आणि तिची एकंदर चालचलणूक एरवींच्या बायकांपेक्षां इतकी निराळीं असें, कीं हिच्या हाताखाली आपली पोरें द्यावीं, असें कोणाहि आईबापाला वाटूंच नये. समाजांतले जे कोणीं उडाणटप्पू लोक असतील, आणि म्हणून ज्यांना बाकीचे लोक दूरचे लेखीत असत, त्यांच्याशीं सुद्धां सुसानची मैत्री असे. पुष्कळांनीं तिला सांगून पाहिलें कीं, "असलें चाळे चालू ठेवलेस, तर चारचौघांत तुला कसलीहि किंमत उरणार नाहीं." परंतु सर्व तऱ्हेचा फटिंगपणा हें सुसानच्या मनाचें मुख्य