फणफणत होता. धड निदान होईना आणि चार-पाच दिवस झाले तरी ताप उतरेना म्हणून टायफॉइड ठरवून ट्रीटमेंट द्यायला सुरुवात झाली.
विश्वजित तिथंच राहिला, सावलीसारखा तिच्या अवतीभवती वावरला. हाक मारली तर मदतीचा हात पुढं करायचा, हाक मारीपर्यंत आपल्या अस्तित्वाचं तिच्यावर आक्रमण होऊ द्यायचा नाही. त्याच्या समजूतदारपणाचाच तिला राग यायला लागला.
एक दिवस तिनं त्याला चिडून विचारलं, 'तुला काही कामधंदा नाही का?'
तो शांतपणे म्हणाला, 'मी रजा काढलीय. विभा, तू थोडी विश्रांती का नाही घेत? मी आहे इथं काही लागलं तर बघायला. इतक्या दिवसांची धावपळ, जागरण, सगळ्यानं तू थकून गेली असशील.'
'तू नाही वाटतं थकलास?'
'थोडासा. पण तुला विश्रांतीची जास्त गरज आहे.'
ती एकदम ओरडली, 'तू तुझा शांतपणा ढालीसारखा पुढं करतोस. तुला कधीतरी रागवावं, ओरडावं आदळआपट करावी अशी खुमखुमी येत नाही का? तुझं असलं वागणं इतरांना किती अळणी वाटतं ह्याची कल्पना आहे तुला?'
तो अगदी हलक्या, जवळजवळ ऐकू येणार नाही अशा आवाजात पुटपुटला, 'सॉरी.'
'सॉरी? अरे मी तुला काय म्हणत्येय ऐकलंस का तू? आणि पुन्हा तूच सॉरी म्हणतोस?'
तो उठून उभा राहिला तशी आवाज एकदम खालच्या पट्टीत आणीत ती म्हणाली, 'कुठं चाललास?'
बाहेर जाऊन येतो जरा. माझं इथं असणं तुला तापदायक होतंय. तुला ताप द्यायची माझी इच्छा नाही.'
त्याला खांदे धरून गदागदा हलवावं असं तिला वाटलं. ती म्हणाली. ताप कसला? तुला कसं काही कळत नाही? थांब, जाऊ नको. मी कॉफी करते, मग आपण हे संभाषण पुन्हा सुरू करू- सुसंस्कृत लोकांसारखं. चारूच्या आयुष्यातली काय जी मिस्टरी आहे ती तू सांगच एकदा मला.'
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/93
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
० ० ०
कमळाची पानं । ९३