पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. खरे भूमातेचे पुत्र; पण प्रत्यक्ष त्या लोकांपेक्षा ही कल्पनाच जास्त रम्य आहे. एकदा तुमची त्यांची जानपेहचान झाली म्हणजे समजतं की दर्शनी मुखवट्यापलीकडे सखोल काही नाही त्यांच्याजवळ. मेंढरांसारखे आहेत ते. सगळे सारखे. मंद, अडाणी, गरीब. आणि जे लोक इतके काही अडाणी गरीब असतात ते इंटरेस्टिंग नसतातच."
 त्याच्याकडे पाहताच ती समजली की तिनं त्याला धक्का दिलाय. ती म्हणाली, "आत जायचं ना आपण? मला फार ऊन सहन होत नाही."
 "ठीक आहे."
 ऊन्हाने रापलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे आणि मानेकडे तिनं कटाक्ष टाकला. आता त्याचा रंग अनाकर्षक, मधूनच गडद छप्पे पडलेला लालभडक दिसत होता. मानोळ्यांजवळची त्वचा मात्र पांढरी उठून दिसत होती.
 “दुपारचा काय कार्यक्रम आहे?" तिनं विचारलं.
 "तुझी हरकत नसली तर आपण जेवल्यावर लगेच निघू. मला मिरवणूक अगदी सुरू होताना पोचायचंय. नंतर आपण मिरवणुकीबरोबर जाऊ. लोकांशी बोलू, फोटो घेऊ. उत्सवाबद्दल मला थोडीशी पार्श्वभूमी माहीत आहे; पण लोकांजवळ बोललं म्हणजे त्यांच्या मनात त्याचं स्थान कोणतं आहे याचं मर्म समजतं. त्याच बाबतीत मला गरज आहे तुझी. तुला वाटलं तर तू मला दुसरा दुभाषी गाठून देऊ शकतेस."
 तो अशा काही सुरात बोलला की जणू काही तिचं येणं न येणं त्याला सारखंच वाटत होतं.
 "मला आवडेल मदत करायला. काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळेल. तेवढाच बदल."
 तो थोडा तिरकस हसला-
 "कधीकधी," तो म्हणाला, "आयुष्याला अळणी म्हणून नावं ठेवली की ते जास्तच तसं वाटायला लागतं."
 "ही दुधारी तलवार आहे. कधीकधी माणूस स्वत:ला फसवत असतो की जगणं फार अर्थपूर्ण आहे म्हणून. वास्तविक तसं नसतं."

 "तसं झालं तर फारसं काही बिघडणार नाही."
 "नाही बिघडत?"
 प्रतापनं लेविनला आपली मोटारसायकल दिली.
 "तू नक्की येत नाहीस ना?" लेविननं त्याला विचारलं.


कमळाची पानं । ९