पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याबद्दल काही बोलावं, विचारावं, गर्भाची वाढ कशी होते ह्याबद्दल कुतूहल दाखवावं, क्वचित चेष्टाही करावी. पण ह्या विषयावर तो संपूर्ण मुका होता. तिनं ह्या गोष्टींची माहिती देणारं एक पुस्तक आणलं होतं ते इकडे तिकडे त्याच्या हाती येईल असं मुद्दाम ठेवलं पण त्यानं त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं.
 पाच महिने गेल्यानंतर डॉक्टरांनी गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येताहेत असं सांगितलं तेव्हा ती मुळापासून थरारली. आपल्या शरीरात एक नवा जीव वाढतोय ह्याचा तिला खराखुरा साक्षात्कार झाला. ती घरी येऊन चारूला म्हणाली, 'चारू, आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू यायला लागलेत.'
 'असं?'
  'ऐकायचेत तुला? हे बघ, इथे कान लाव आणि अगदी गप्प राहा. श्वाससुध्दा रोखून धर. मग बघ ऐकू येतात का'
 'राहू दे विभा, मी आज त्या मूडमध्ये नाही. पुन्हा कधीतरी.'
 ह्यात मूड काय असायचाय असं ती विचारणार होती, पण तो खरंच दमलेला आणि कसल्यातरी तणावाखाली असलेला दिसत होता. तिला वाटलं, त्याला स्वत:च्या कटकटी असतीलच. आणि वर मीही मला ज्याचं कौतुक वाटतं अशा सर्व लहानसहान गोष्टींबद्दल त्याचा उत्साह ओसंडून जायला पाहिजे अशी मागणी करायला लागले तर त्यानं बिचाऱ्यानं ती कुठवर पुरवावी?
 त्याच्या सुंदर दाट केसांतून बोटं फिरवीत तिनं विचारलं, 'काय झालं चारू!'
 'कुठं काय?'
 'बरं नाही का तुला? कुणी काही लागेलसं बोललं का?'
 तो एकदम तिच्या कुशीत शिरत म्हणाला 'विभा. काही विचारू नको मला. फक्त जवळ घे. अगदी घट्ट धरून ठेव. मला कधी दूर लोटू नको गं.मी ते सहन करू शकणार नाही.'
 तिचं मन त्याच्याविषयी अपार करुणेनं भरून आलं. ती म्हणाली, 'अरे वेड्या, मी कशी तुला सोडून जाईन?'
 मग कितीतरी वेळ, त्याचा श्वासोच्छवास सावकाश आणि नियमित येईपर्यंत ती त्याला थोपटत, कुरवाळत राहिली. तिच्या पोटातल्या जिवानं बारीकशी उसळी मारून तिला आपलं अस्तित्व जाणवून दिलं तेव्हा तिला आपलं अंग अवघडल्याचीही जाणीव झाली. तिनं अलगद चारूला बाजूला सारून कूस