पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हरलो असं तिला वाटत राहिलं.
 एक दिवस तिनं चारूजवळ त्याच्या कुटुंबाचा विषय काढला. गप्पांच्या ओघात सहज विचारल्याच्या आविर्भावात तिनं विचारलं, 'तुझे आईवडील असतात कुठे सध्या?'
 तो एकदम तुटकपणे म्हणाला, 'मला आईबाप नाहीत.'
 'असं कसं होईल?'
 'जे होते त्यांनी आईबाप म्हणवून घ्यायचा हक्क गमावला आहे.
 'पण झालं काय असं?'
 त्यानं उत्तर दिलं नाही. तिनं जास्त आग्रह धरला नाही, कारण तो एकदम अस्वस्थ, ताणलेला वाटला. पुन्हा ह्याबद्दल बोलणं झालं नाही, पण कशाची तरी संगती लागत नाही. काहीतरी कुठंतरी चुकतंय अशी जाणीव तिला होत राहिली. ठीक आहे, नसेल आईबापांशी पटत, पण त्या नात्यावर असा एकदम पडदा टाकायचं काय कारण? त्याच्याविषयी काही बोलायचंच नाकारायचं ह्याचा काय अर्थ? असे प्रश्न विचारून तिनं स्वतःला बजावलं की हा वेडेपणा आहे. मिळत असलेल्या सुखाचा उपभोग घ्यायचा सोडून कसल्यातरी काल्पनिक काळजीचं सावट त्याच्यावर पाडायचे नसते उद्योग कुणी सांगितलेत?
 मग बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक बोच निर्माण करणारा प्रसंग घडेपर्यंत तिच्या आयुष्याचा प्रवाह अडथळ्याविना वाहात होता. त्या दिवशी चारू ऑफिसातनं तणतणत घरी आला.
 'हे लोक असा क्षुद्रपणा का करतात मला समजत नाही.
 'काय झालं?'
 'अकाउंटंटनं माझं एक व्हाऊचर पास केलं नाही.'
 'का?'
 'माझी सही नव्हती त्याच्यावर.'
 'मग घेता आली नाही का?'
 'मी ऑफिसात नव्हतो. दुसऱ्या कुणाला तरी पैसे घेऊन ठेवायला सांगितलं होतं. परत आलो तर पैसे नव्हतेच. कॅश द्यायची वेळ संपली होती. चौकशी केली तर हे कळलं. मी म्हटलं मागनं सही घेतली असती तर चाललं नसतं का? तर अकाउंटंट म्हणतो, राहिली असती किंवा तुम्ही केली नसती तर जोखीम आमच्यावर आहे. उद्या ऑडिटरने खडे फोडले म्हणजे साहेब आम्हालाच

कमळाची पानं ।८४