पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "कधीकधी मला वाटतं की हे जग खूप काहीतरी देऊ शकेल माणसाला पण मी मुळी या जगात नाहीचाय!"
 "पण हा जगाचाच भाग आहे ना?"
 "फार लहानसा."
 "सबंध जग कुणालाच गवसत नाही." त्याच्या आवाजातील सूक्ष्म नाराजी तिला जाणवली- एखाद्या मुलाला अगदी साधी गोष्ट पटत नसली म्हणजे मोठ्या माणसांना वाटते तशी. थोडा वेळ ते दोघं स्तब्धपणे चालत राहिले. मग तिनंच पुन्हा बोलायला सुरुवात केली-
 "स्टेट्समध्ये प्रतापशी ओळख होती तुझी?"
 "अं हं! तो माझ्या भावाचा मित्र होता. भारतात मी या भागात येणार आहे असं बॉबला कळलं तेव्हा त्यानं मला तुमचा पत्ता दिला. खरोखरच मी इथं येईन असं मला वाटलं नव्हतं; पण मग मला घोड्यांच्या या उत्सवाबद्दल समजलं आणि माझ्या लक्षात आलं की उत्सवाच्या गावापासून तुम्ही जवळच राहता."
 "आमच्याकडे येणारे पाहुणे नेहमीच काहीतरी कारण घेऊन येतात. त्यातले बरेचसे आमचे शहरातले मित्र किंवा नातेवाईक असतात. त्यांना वाटतं की सुट्टीसाठी खऱ्याखुऱ्या शेतावर जाऊन राहणं ही एक 'खासियत'. ते आम्हाला भेटायला येतच नाहीत."
 "मग मी पण दोषी आहे त्याबाबतीत. पण इथं येण्याचं कारण कोणतंही असलं तरी तुझी भेट होण्याची संधी मिळाली याचा फार आनंद होतो मला."
 त्यानं किंचित् झुकून तिला पाश्चात्य पद्धतीनं अभिवादन केलं. "एक सांग," तो म्हणाला, "ती कुठं राहते? ती पाखरं हाकलणारी?"
 अचानक विषय बदलला गेल्यामुळे झालेली स्वत:ची निराशा लपवण्याचा सरोजिनी प्रयत्न करत होती.
 "इथून जवळच,' ती म्हणाली. "का बरं?"

 "मला मोठं कुतूहल वाटतं. ती कशी राहते? कसले विचार करते? तिच्या जीवनाचा गाभा कोणता असेल?"
 "तुला तिच्याविषयी कुतूहल वाटतं हे समजल्यावर ती खूष होऊन जाईल की नाही कुणास ठाऊक! बहुतेक नाहीच. या लोकांवर मी नेहमी स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आरोप करीत असे. मला भेटलेल्या इतर सर्वांपेक्षा ते वेगळे


कमळाची पानं । ८