सर्व शेतकरी शहरात राहतात. पण आम्हाला ते पुरेसं वाटलं नाही. आम्हाला अगदी अस्सल खेडं पाहिजे होतं. प्रताप नुकताच अमेरिकेहून परत आला होता, आणि कल्पना भरपूर होत्या त्याच्या डोक्यात. प्रत्यक्ष शेतीवर जाऊन राह्यचं हे फार आकर्षक वाटलं त्यावेळी. मी पण त्याच्याइतकीच उत्सुक होते. स्वत:च्या करिअरचा विचार मी कधी केलाच नव्हता आणि त्याच्या कामात स्वत:ला झोकून देणं ही पुरेशी करिअर वाटली मला. पण पुढं मला तो उत्साह टिकवणं जमलं नाही. शेती करणं हे किती कंटाळवाणं काम आहे, खरं म्हटलं तर. वर्षामागून वर्षं जातात आणि तुमचं रुटीन तेच राहतं. मनात दिलासा द्यायला जर एखादं स्वप्न नसलं तर रुटीन जीव घेईल एखाद्याचा."
"प्रतापचं काय?"
"तो तरारतो आहे जोमानं. इथं फार सुखी आहे तो. पण तो स्वप्नावर तग धरून राहात नाही मात्र!"
"मग कशामुळं?"
"कदाचित एक प्रकारचा अभिमान आणि जितका जास्त तो इथं राहील तितकी खोल जातील त्याची पाळंमुळं इथं. दुसऱ्या कुठंही चुकल्याचुकल्यासारखं होईल त्याला. तो तसलाच मनस्वी माणूस आहे."
"मग तुला हे कठीण जात असेल."
ती मंदमंद हसली.
"या बाहेरचं जग नाहीच आम्हांला. प्रताप सुस्वभावी आहे पण मित्रांची जरुरी भासत नाही त्याला. नुसतं गप्पा मारायलाही कुणी लागत नाही. जोपर्यंत कामात गढलेला असतो तोपर्यंत त्याला करमणुकीची देखील गरज वाटत नाही. कधी एखाद्या वेळी इथं एकटंएकटं वाटतं, असंही वाटून जातं की इथून कुठंतरी निघून जावं आणि परतच येऊ नये."
"मग, का नाही तसं करत?"
"त्याने काही होणार नाही. स्वत:चं असं एक वेगळं आयुष्य असावं या दृष्टीनं मी कधी विचारच केलेला नाही. कुणास ठाऊक, मला ते जमेल का नाही ते."
"करून तर पाहा."
"पण पायात शेपटी घालून परत यावं लागलं तर फार भयंकर, नाही का? शिवाय, प्रताप इथं आहे हाही एक मुद्दा आहे."
लेविननं खांदे उडवले आणि हात खिशात घातले.