पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'त्यावेळी लग्नाबद्दल तुमचं काही बोलणं झालं होतं?'
 ती हसली. 'त्यानं जाण्यापूर्वी सांगून ठेवलं होतं की मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण तू अजून खूप लहान आहेस तेव्हा मी तुला विचारायला काही वर्ष थांबणार आहे.'
 हा टोनी भयानक धूर्त होता. एका बुद्धिमान आणि संस्कारक्षम मनावर त्यानं पकड घेतली आणि सवडीनं ती पकड घट्ट करीत आपल्याला हवी तशी बायको घडवली. शिवाय तिचे आईबाप परवानगी देणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे ती कायद्याने वयात येईपर्यंत आपला इरादा जाहीर केला नाही. आणि ही भोळी मुलगी जगाचा काही अनुभव यायच्या आतच स्वत:ला बंधनात टाकून मोकळी झाली.
 थोड्या वेळाने मी जायला उठले तशी ती म्हणाली, 'एवढ्यात निघालात? जेवूनच जा ना आता.'
 'नको आता उशीर झालाय.'
 ,'असं काय? थांबा ना. टोनी पण भेटेल आणि मलाही तुमच्याशी आणखी गप्पा करता येतील. खूप दिवसांनी मराठी बोलायला मिळालं म्हणून खूप आनंद झालाय मला.'
 'टोनीला मराठी येतं ना?'
 तिनं ओठ मुरडले. 'काय चार मोडकीतोडकी वाक्यं बोलण्यापुरतं येत होतं तेही आता विसरलाय. इथे आधी आम्हाला इटालियन शिकायचंय ना, तर एकमेकांशी कटाक्षाने इटालियनच बोलतो आम्ही. मग थांबता ना?' तिने पुन्हा मुद्याचा प्रश्न विचारला.
 टोनीला बघण्याचं कुतूहल होतंच, आणि तिचा गोड आग्रहही मोडवेना, म्हटलं, 'बरं थांबते.'
 'ओ वंडरफुल,' ती टाळी वाजवून म्हणाली, 'मला जरा बाजार करायचा येता माझ्याबरोबर? की थांबता इथेच?'
 'चल येते. तुला पिशव्या धरायला मदत.'
 तिचं बाजार करणंही बघण्यासारखं होतं. जिथे एक दिवसाच्या शिळ्या केक्स स्वस्त मिळतात ती बेकरी तिनं मला दाखवली. मग कुठल्या दुकानात इतर कुठल्या वस्तू स्वस्त मिळतात. कुठला खाटिक तिच्या प्रेमात पडल्यामुळे तिला निवडक कट्स देतो, सकाळी सकाळीच मळेकरी स्वत:च्या मळ्यातला माल विकायला आणतात, तिथनं भावाबद्दल भारतातल्या सारखीच घासाघीस

कमळाची पानं । ६४