मी म्हटलं, 'पण तो तुला भेटला त्यावेळी विद्यार्थीच होता ना? मग शिकणं वगैरे सगळं निरर्थक वाटत होतं तर ते त्यानं सोडून का नाही दिलं?'
ती हसली. 'तो असाच नावापुरता विद्यार्थी होता. प्रवासाचा चान्स मिळतोय म्हणून त्याने एका मराठीच्या कोर्ससाठी नाव नोंदवलं. तो जो प्रबंध लिहीत होता तो त्या कोर्सचा आवश्यक भाग म्हणून. त्यात त्याला काही विशेष इंटरेस्ट होता म्हणून नव्हे.'
'हे तुला त्यानं त्यावेळीच सांगितलं?'
'हो. तो भारतात आला तो काही एक कल्पना घेऊन. पण त्याला जे हवं होतं ते तिथे मिळणार नाही असं त्याला वाटलं म्हणून तो परत गेला. पण तिथही त्याचं मन रमेना. मग तो अशाच एका ग्रुपबरोबर युरोपात आला.'
'आणि तो जे शोधीत होता ते त्याला इथे मिळालं?'
'अगदी असंच काही नाही, पण रोम शहर त्याला आवडलं, म्हणून काही वर्षे तरी इथे राहायचं असं त्यानं ठरवलं.'
'मग ह्यात तू कुठे आलीस?'
'खरं म्हणजे पत्रांतूनच आमचं लग्नाचं पक्कं झालं होतं. पण मी त्याच्या मागं लागले होते की तू येऊन आईदादांना भेट.'
'सगळं रीतसर करायचं होतं वाटतं तुला?'
ती मनापासून हसली. 'तसं नव्हे, पण मला वाटलं, तो प्रत्यक्ष आला, भेटला म्हणजे तो अगदीच कुणीतरी उपरा आहे असं त्यांना वाटायचं नाही.'
'त्यांच्या माहितीचाच होता ना तो?'
'तसा होता, पण आमची पत्रांतून कुठपर्यंत मजल गेलीय ह्याची कल्पना नव्हती. मी सांगितलं असतं की मी रोमला जात्येय टोनीशी लग्न करायला तर त्यांना धक्काच बसला असता.'
'नाहीतरी बसलाच असेल की.'
'तरी इतका नाही. अर्थात मी हे लग्न करू नये म्हणून माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण माझा निश्चय झालेला होता. मग शेवटी दिली संमती.'
'काय ग, टोनी तुला प्रथम भेटला तेव्हा तुला त्याच्याबद्दल काय वाटलं होतं?'
तिनं जरा विचार केला. 'खूप आवडला होता, आणि आणखीही काही वाटलं होतं. त्याच्यासारखं कुणी मला कधी भेटलंच नव्हतं.'
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/63
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ६३