पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निरनिराळ्या अनेक क्षेत्रांत असू शकेल.'
 मी उपरोधाने म्हणणार होते - हो, दुकान चालविण्यात देखील. पण असं बोलण्याचा अधिकार मला नव्हता.
 'मी आईदादांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते समजून घ्यायला तयार नाहीत.' तिनं छोटासा सुस्कारा टाकला.
 ह्यात समजून काय घ्यायचं होतं? ज्या मार्गाने मोठ्या दिमाखात चाल केली तो चांगला सरळ मार्ग सोडून हिनं असलं प्रवाहपतित आयुष्य स्वीकारायला तिच्या आईवडिलांना पटेल असं कोणतं कारण असू शकणार?
 मी म्हटलं. 'पण तुझी एवढी चांगली करियर होती. त्याच्यावर एकदम पाणी सोडताना तुला वाईट नाही का वाटलं?'
 'करियर म्हणजे काय मावशी? कुठेही अगदी विचार करून मला अमक्याचीच आवड आहे म्हणून ते करायचंय असं म्हणून निवड केलीच नव्हती. कुणीतरी ढकलल्यासारखं एक विशिष्ट प्रवाहातनं वाहात होते एवढंच. माझ्या व इतरही अनेकजण काही कारणाशिवाय त्याच प्रवाहातनं वाहात होते एवढंच. माझी बुद्धी जरा तल्लख म्हणून केवळ माझ्या वाहाण्याला करियर म्हणायचं का? खरं म्हणजे ज्यावेळी लोक माझ्या करियरबद्दल कौतुकानं बोलत होते, माझ्या भविष्यकाळाबद्दल उंच उंच अपेक्षा करीत होते, त्यावेळी मला मात्र डेड एंडला येऊन पोचल्यासारखं वाटत होतं.'
 रोमा आत्तापर्यन्तचा खेळकरपणा सोडून गंभीरपणानं बोलत होती,पण तिच्या बोलण्यात तीव्रता नव्हती. आपली बाजू पटवण्याचा आग्रह नव्हता.फक्त आपली बाजू मांडायला मिळाल्याचं समाधान होतं. खरं म्हणजे तिचं वय बावीस-तेवीसच असलं तरी तिचा पोषाख, तिचं किंचित बाळसेदार शरीर, घाईगडबडीची, चपळ हालचाल ह्या सगळ्यांमुळे ती वाटत होती एखाद्या शाळकरी मुलीसारखी. म्हणून ती जे बोलत होती ते कुठून तरी उसनं घेऊन घोकल्यासारखं वाटत होतं, तिला आतून पटल्यासारखं वाटत नव्हतं.
 मी विचारलं, 'हे असं तुला कधीपासून वाटत होतं?'
 'खरं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. टोनीनं मला विचाराप्रमाणं वागण्याचं धैर्य दिलं. तो भेटला नसता तर मी धरल्या वाटेनं चालत राहिले असते झापडं बांधल्यासारखी.'
 म्हणजे मला वाटलं होतं ते बरोबर होतं. ती त्याची गॅलाटिया होती.

कमळाची पानं । ६२