पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुठेही दिसणाऱ्या तरुण मुलींसारखी दिसत होती.
 तिनं माझ्याकडे पाहून घेतलं. गोडसं हसली नि म्हणाली, 'या ना, आत या.'
 मी जराशी गोंधळले. म्हटलं, 'तुम्हाला माहीत होतं मी येणारय म्हणून?
  'नाही.'
 "मग?'
 'देशापासून इतकं लांब आलं की कोणीही भारतीय माणूस आपलंच वाटत.
 मी तिच्यामागोमाग आत गेले. 'माफ करा हं. सगळं अगदीच अस्ताव्यस्त आहे. म्हणून ती भराभर खोली आवरायला लागली. इकडेतिकडे विखुरलली पुस्तकं नि मासिकं टेबलावर गठ्ठे करून ठेवली. बैठकीच्या कव्हरच्या सुरकुत्या साफ केल्या. उशा नीट मांडून ठेवल्या. खुर्चीशेजारी जमिनीवर ठेवलेली कपबशी उचलून आत नेली. 'आणि मला अहोजाहो करू नका बाई. अगदी मिडलएज्ड झाल्यासारखं वाटतं.' ती हसली.
 मी स्वत:ची ओळख करून दिली आणि म्हणाले, 'तुझ्या मामांनी पत्ता दिला तुझा. आम्ही एकाच ऑफिसात असतो. मी म्हटलं आत्ता घरी सापडशील की नाही, पण ह्या बाजूला आले होते म्हणून चान्स घेतला.'
 'खरं म्हणजे मी नसतेच यावेळी घरी. पण आज माझं सुदैव ' शेवटचा तास नव्हता.'
 'काही शिकतेस वाटतं?'
 'सेक्रेटेरिअल कोर्स घेतलाय. इटालियन भाषाही शिकत्येय. तशी बोलता- बिलता येते. पण नोकरी मिळवण्याच्या दृष्टीनं पुष्कळच चांगली यायला पाहिजे नाही का?'
 तिनं आपल्या चिमुकल्या स्वैपाकघरातनं कॉफी करून आणली. फ्लॅट एवढाच दिसत होता. झोपाय-बसायची खोली नि स्वैपाक घर. सामानही बेताचंच आणि स्वस्तातलं. सेकंडहँड घेतल्यासारखं दिसत होतं.
 'इथल्या लोकांना तुझ्या नावाची गंमत वाटत असेल नाही? मी विचारलं
 'हो ना, आणि टोनी त्यांना काय वाट्टेल ते सांगतो. कधी म्हणतो रोममध्ये राहायचं ठरवलं मग त्याच नावाची बायको नको का? तेव्हा दिली जाहिरात. कधी म्हणतो मी हिच्या प्रेमात पडलो तेव्हाच ठरवलं की हिच्याशी लग्न करायचं तर रोममध्येच रहायला पाहिजे. ती हसतहसत पुढं म्हणाली 'इथं येईपर्यंत ह्या शहराचं इटालियन नाव रोमा आहे हे ठाऊकच नव्हतं

कमळाची पानं । ६०