देईन. स्वत:ला अभेद्य समजत असल्यामुळे मी स्वत:च्या बचावासाठी तटबंदी उभारण्याची तजवीज केली नव्हती. त्यामुळं आता हल्ला झाल्यावर त्याला तोंड द्यायला सर्वस्वी असमर्थ ठरले होते.
सरिता उठली. म्हणाली, 'मला जायला पाहिजे आता.' बिछू म्हणाला, 'बराच उशीर झालाय गं. मी तुला होस्टेलवर पोचवायला येतो. चल.'
साडेसातच झाले होते. पण ती 'स्त्री' होती. नाजूक, असहाय्य, संरक्षणाचा गरज असलेली. त्यानं सहजपणे आपला हात तिच्या कमरेभोवती लपेटला, आणि एकदम डोक्यात शिरलं की ह्या दोघांचं हे बऱ्याच दिवसांचं नातं आहे. ती एकमेकांशी किती सहजपणे, न संकोचता वागत-बोलत होती. मला राग आला. बिछूनं ही अशी लपवाछपवी का केली? करण्याची त्याला गरज का भासली?
तिच्या उघड्या कमरेवरचा त्याचा हात माझ्या डोळ्यांसमोरून हालेना. त्यांचे एकमेकांशी किती जवळचे संबंध होते? तिच्या सहवासात त्याच्या शरीराला एक नवीच भूक जाणवून तिचं समाधानही होत होतं का?
एक खोल वेदना जाणवली. तृप्त होण्याची सवय लागते, मनाला तशाच शरीरालाही. बिछूचा बाप गेल्यानंतर मी रात्रीमागून रात्री जागून काढत होते. जाणीव होती ती फक्त आता परत जे कधी मिळणार नाही त्याकरता आक्रंदून उठायची त्याची. ह्या यातनेनं आपल्या अनेक भुजांनी विळखा घातलल्या अवस्थेत मनात येऊ नये तो विचार यायचा. दोघांपैकी एकाचं मरण माझ्या नशिबी होतंच, तर मरणारा बिछू का नव्हता? बिछू आत्ता ज्या वयाचा आहे तेवढी होते मी तेव्हा.... म्हणून काय झालं, मी आता स्वत:ला विचारलं, मी गमावलं होतं-तेही काही त्याच्या चुकीमुळं नव्हे-ते त्याला मिळू नये अशी क्षुद्र इच्छा मी करते आहे?
आणि जगदीशचं काय, मी पुन्हा प्रश्न केला. पुरुषाच्या सहवासाने पुन्हा सर्वार्थानं जागी होऊ शकते हे पटल्यावरही मी स्वत:ला जाणूनबुजून भुकेलंच राहू दिलं, त्याचं काय?
ते काही चालायचं नाही, मी स्वत:ला बजावलं. मी जर बिछूकरता कशाचा त्याग केला असला तर तो स्वेच्छेनं. त्यानं सांगितलं म्हणून नाही मग जे मुळात स्वत:च्या समाधानासाठी केलं त्याबद्दल विचार करताना परतफेड कृतज्ञता असल्या दुष्ट शब्दांचा आश्रय कां घेत्येय मी?
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/52
Jump to navigation
Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ५२
