पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'वा:, पुढं काय करणार आहेस?'
 बिछू चटकन म्हणाला, 'आधी बी. ए. होऊ दे. मग पुढचं पुढं.'
 'पण काहीतरी ठरवलं असशील ना तू?' मी तिलाच पुन्हा विचारलं.
 'खरं म्हणजे मी तसा फारसा विचार केला नाही त्याबद्दल,' ती म्हणाली.
 बिछू हसत म्हणाला, 'सगळेचजण काही हायस्कूलमध्ये असल्यापासून सबंध आयुष्य प्लॅन करून ठेवीत नाहीत. आणि प्रत्येकाला अगदी करिअरच हवी असते असं नाही.'
 'म्हणजे प्रत्येकीला असंच तुला म्हणायचंय ना?' मी म्हटलं.
 'हो. म्हणजे काय आहे, स्त्रीपुरुषांची समानता वगैरे तत्त्वत: मला पटतं. पण त्यांचे आयुष्यातले रोल्स वेगळे असतात हे आपण नाकारू शकत नाही. घरकाम करून मुलांना सांभाळणारी बाई नोकरी करणारीइतकंच उपयुक्त काम करीत असते.'
 'खरं आहे.'मी म्हटलं.
 बिछू हे सगळं इतक्या चपखलपणे मांडत होता की त्यानं माझ्याशी सामना म्हणून ते आधीपासून पाठ करून ठेवलं असलं पाहिजे, किंवा त्याच्या विचारांत संपूर्ण परिवर्तन झालं असलं पाहिजे.
 लग्न करायचंच होतं तर दुसरी कोणी- ह्या वेळी मी फारच जोरानं लगाम खेचला. लग्न करायचंच होतं तर. तर म्हणजे काय? कदाचित तो लग्न करणारच नाही अशी शक्यता मी मनात बाळगली होती का? अर्थातच नाही. मी रागानं स्वत:लाच म्हटलं. बायकांचं आपल्या सुनांशी न पटणं ह्या विषयाचा मी मानसशास्त्राच्या आधारे सहजपणे उहापोह करीत असे. त्या वेळी अर्थातच 'मी त्यातली नाही' हे अध्याहृत असे. मग शेवटी मी त्यातलीच का?
 नाही. ती त्याला साजेशी असती तर-
 पण ही आत्मवंचना आहे. ती सर्व दृष्टींनी परिपूर्ण असती तरी मी सुखासुखी त्याला तिच्या हवाली केलं नसतं. आत्तासुद्धा मला समाधान एवढंच वाटतंय् की कधीतरी पुढं बिछूला पटेल की आपली आई आपल्या बायकोपेक्षा श्रेष्ठ दर्जाची स्त्री आहे. तो कदाचित असं कबूल करणार नाही, पण मनातल्या मनात त्याला हे पटल्याशिवाय राहणार नाही.
 माझी खात्री होती की मी इतर आयांसारखी नाही. मी काही फक्त बिछू साठी जगत नाही. तेव्हा तो लग्न करायला निघाला की मी त्याला आनंदानं आशीर्वाद

कमळाची पानं । ५१