पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कॉफी होत होती तोवर मी तोंड धुवायला आत गेले. सरितेशेजारी मी थकलेली, विस्कटलेली दिसत असले पाहिजे असं मला वाटलं. माझ्या थकव्यात दिवसभर केलेल्या कामाचा वाटा तर होताच, पण जगदीशच्यात नि माझ्यात निर्माण झालेल्या तणावाचाही होता. इतके दिवस संथपणे वाहात असलेला प्रवाह एकाएकी खालपासून ढवळून निघाला होता. मी खूप पाणी मारून तोंड धुतलं. तोंड पुसल्यापुसल्या माझी त्रेचाळीस वर्षांची कातडी सुकून ओढल्यासारखी दिसायला लागली. मी तोंडाला थोडं कोल्ड क्रीम चोळलं, केस विंचरले, साडी बदलायचा विचार केला आणि मग माझं मलाच हसू आलं. मी सरितेशी स्पर्धा करावी? तिच्यात नाही असं माझ्यात खूप काही होतं. फक्त तारुण्य आणि सौंदर्य सोडून. पण एक असं वय असतं कि तेव्हा पुरुषाला ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या वाटतात. किंवा कदाचित कोणत्याही वयात वाटत असतील. कदाचित जगदीशलाही मी आता नको असेन. त्याचं प्रेम मी एके काळी जशी होते त्याच्या आठवणीवर असेल माझ्यावर नसेलच.
 कॉफी तयार आहे म्हणून बिछूनं हाक मारली. खोलीतनं बाहेर पडायच्या आत मी सरितेला म्हणताना ऐकलं, 'लहानपणी दिलेली नावं मुलांना मोठेपणीही चिकटू देणं हा शुद्ध अन्याय आहे.' म्हणजे तिच्याकडून लढाईला तोंड लागलं होतं.
 त्याचं खरं नाव विश्वास. पण तो लहान असताना कुणी विचारलंं की सांगे बिछू, आणि तेच प्रचलित झालं. बिछू हे बेबी, बाळ त्यांच्यासारखं मूर्ख टोपणनाव आहे असं मला कधी वाटलं नाही. बिछूचा पोरपणा, मोकळेपणा, मनात येईल ते पटकन बोलण्याचा, करण्याचा स्वभाव ह्या सगळ्याला नेमकं शोभतं असं मला नेहमीच वाटत असे.
 मी बिनबोलता कॉफी प्यायला सुरुवात केली. जराशा अस्वस्थ शांततेत बिछू आणि सरिता गप्पा मारायला लागले. तिच्या कॉलेजातली निवडणूक, कुठल्यातरी सिनेमातलं व्हिलनचं काम, भारतानं जिंकलेली क्रिकेटची टेस्ट असल्या क्षुल्लक गोष्टींत खरंच कुणी रस घेऊ शकतं?
 'कुठल्या वर्षाला आहेस?' मी तिला विचारलं.
 'थर्ड इयर बी. ए. ला.'
 'कोणता विषय?'
 'इकॉनॉमिक्स.'

कमळाची पानं । ५०