हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं
द्राक्षाच्या मळ्यातल्या मचाणावर हिराबाई उभी होती. उन्हानं रापलेला तिचा सावळा हात आकाशाच्या पार्श्वभूमीवर अलगद रेखाटला गेला होता. हातातली गोफण ताठ खेचली गेली होती. पक्ष्यांना घाबरवणारी तिची ती विशिष्ट गुंतागुंतीची साद तिनं पुन्हा एकदा घातली. तिच्या हाकेची सुरुवात पारव्याच्या गुंजनासारख्या अनुनय करणाऱ्या लयबद्ध आवाजानं व्हायची. मग ती दटावणीचा सूर काढायची. हळूहळू ही दटावणी मोठीमोठी आणि कर्कश्य होता होता तिचं शिखर एका प्रमत्त अर्धवेड्या किंकाळीत गाठले जाई. मग तिचा आवाज तार सप्तकातून एकदम खाली उतरायचा आणि या सादाची अखेर विनवणाऱ्या धूसर, ढाल्या गोड आवाजानं व्हायची.
विल्यम लेविन फोटो काढण्यात गढून गेला होता.
"सगळी फिल्म तिच्यावरच नासू नकोस." सरोजिनी म्हणाली, "इथं दुसरी मिळायची नाही."