पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 संध्याकाळी लॅबमधून येते तो बिछू घरी आलेलाच होता. त्याच्याबरोबर एक मुलगी होती. ह्यात तसं काही विशेष नव्हतं. तो बरेचदा आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आणायचा. तसं करायला त्याला संकोच वाटू नये अशी मी पहिल्यापासून खबरदारी घेतली होती.
 बिछूनं आमची ओळख करून दिली न् आम्ही एकमेकींना नमस्कार केला. बसण्याबोलण्याचा माझा मूड नव्हता म्हणून मी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण कसल्यातरी सूक्ष्म जाणिवेनं मी एकदम बिछूकडे पाहिलं. तो जरा चिंतायुक्त नजरेनं माझ्या रिॲक्शनचं निरीक्षण करीत होता. म्हणजे ही 'ती' मुलगी होती तर, जिच्याबद्दल मी अनेकदा विचार केला होता, पण जिला अजून काही रंगरूप बहाल केलं नव्हतं ती. आता त्या बाह्यरेखेत तपशील भरले गेले. नाव : सरिता, हल्ली जरा फॅशनेबल असलेलं. चेहरा : सुरेख पण व्यक्तिमत्त्वशून्य. हो, मी लगाम खेचला. नुसतं सुरेख म्हण, आणखी वर्णनात्मक विशेषणं घालण्याची जरूर नाही.
 मी तिच्याकडे नीट पाहून घेतलं. तोकडं पोलकं आणि बेंबीच्या खाली नसलेली साडी. ह्यांच्यामध्ये बरीचशी पाठ, कंबर नि त्याखालची डौलदार वळणं दिसत होती. खांद्याइतके लांब केस मोकळेच होते. डोळे अशा तऱ्हेने मेकअप केले होते की ते तिरकस दिसावे. ओठांवर पांढुरकी तकाकी होती. सगळं मिळून रूप काही वाईट दिसत नव्हतं. पण हे सगळं करायला किती वेळ लागत असला पाहिजे? स्वत:ची सौंदर्यसाधना करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असा काही उद्योग तिला नव्हता म्हणायचा! पुन्हा मी लगाम खेचला. अजून ओळखही झाली नसताना तिच्यावर असली टीका करायचं मला काही कारण नव्हतं.
 मी म्हटलं, 'बिछु, थोडी कॉफी कर ना आपल्या सगळ्यांसाठी.' सरितेच्या बाकदार भुवया- त्यांचा आकार नैसर्गिक असणं शक्यच नव्हतं- थोड्या वर उचलल्या गेल्या. ती लाडिकपणे म्हणाली, 'मी करते की', आणि बिछूच्या पाठोपाठ स्वैपाकघरात निघून गेली. बाई असताना घरातल्या पुरुषानं स्वैपाकघरात काम करायचं? छी:! ह्या प्रतिक्रियेची तिच्याकडून अपेक्षा करूनच मी बिछूला कॉफी करायला सांगितलं होतं. बाईचं काम, पुरुषाचं काम असल्या मानवनिर्मित विभागणीला मी नि बिछू नेहमी हसत असू. पुरुषानं घरकाम करण्यात काही लाज नाही असं मी त्याला लहानपणापासून शिकवलं होतं.

कमळाची पानं । ४९