पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेतली. आम्ही बिनबोलता एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे स्पर्श करण्याच्या अनिवार गरजेनं आमचे हात टेबलावर एकत्र आले, गुंफले गेले. आमची शरीरं पूर्वी ह्याहून कितीतरी जवळ आलेली होती, पण त्या जवळिकीपेक्षाही ह्या स्पर्शात काहीतरी जास्त उत्कट होतं.
 'आयॅम सॉरी!' तो म्हणाला. त्याचा आवाज एकदम थंड, तिऱ्हाइताचा होता. 'तुला जे पटतं ते कर. पण आत्ता नक्की काय ते ठरवू नको.' त्यानं आपला हात सोडवून घेऊन त्याचा तळवा माझ्याकडे करून धरला. 'अंहं. आत्ता आणखी काही बोलूच नको, आणि मलाही मागून पश्चाताप होईल असं बोलायला लावू नको. दोनतीन दिवस विचार कर आणि सोमवारी तुझं काय ठरतंय ते मला कळव.'
 हे थांबायला सांगणं केवळ औपचारिक होतं हे त्याच्या आवाजावरून मला कळलं. तरी पण मी नुसतीच मान हालवली नि तिथून निघून गेले.
 मी जाणार नाही असं म्हणताना तो रागावणार ह्याची मी अपेक्षा केलीच होती. तरी पण त्याच्या रागाच्या तीव्रतेनं मी हबकले. इतकं रागावण्याएवढं त्याला अजून माझ्याबद्दल काही वाटतं म्हणून सुखावलेही. पण त्याच्यामागोमाग रागावलेही. एकप्रकारे त्याच्या ह्या वाटण्याची तो माझ्यावर जबाबदारी टाकीत होता आणि असली जबाबदारी मला नको होती.
 माझ्या रागावर मन स्थिरावून त्याच्या वेदनेला मी विसरू पाहात होते आज मी त्याच्या डोळ्यांत जे पाहिलं ते आठ वर्षांपूर्वी पाहिलं होतं, जेव्हा त्यानं मला लग्नाबद्दल विचारलं आणि मी नाही म्हणाले तेव्हा. मी त्याच्यावर प्रेम करीत होते म्हणून नाही म्हणणं मला फार अवघड वाटलं होतं. पण काहीच निर्णय न घेता दिवसामागून दिवस ढकलत कायमची काही मी राहू शकणार नव्हते, निर्णय घ्यायला हवाच होता आणि तो बिछूच्या बाजूनं व्हायला पाहिजे हेही माझ्या लेखी उघड होतं. समजा, मी जगदीशला होकार देऊन टाकला असता न् मग त्याचं न् बिछूचं पटलं नसतं तर बिछूवर मोठा अन्याय झाला असता. मी त्याची आईबाप दोन्ही होते. ज्या वयात त्याला माझी सगळ्यात गरज होती त्या वयात त्याच्या-माझ्यात भिंत उभी राहिली असती. आणि मग चुकीच्या निर्णयाबद्दल स्वत:ला जन्मभर दोष देत राहण्यापलीकडे दुसरं काहीच माझ्या हातात राहिलं नसतं. तेव्हा अगदी विचार करूनच मी निर्णय घेतला. जगदीशचं मी काही लागत नव्हते. तेव्हाही नाही नि आताही नाही.

कमळाची पानं । ४८