पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणि मग इतकी वर्ष लांबणीवर पडलेलं भांडण आम्ही भांडलो. मी त्याला सांगितलं की सहा महिने बिछूला एकट्याला सोडून मला जाता येणार नाही. त्याची मेडिकल कॉलेजची शेवटची टर्म होती. शिवाय दुसरीकडे कुठं त्याची सोय होण्यासारखी नव्हती.
 'अन्, तू विमेन्स लिबबद्दल गप्पा माराव्यास,' जगदीश म्हणाला. 'पुरुष असल्या क्षुल्लक कारणासाठी आपली करिअर कधीच धोक्यात घालणार नाही.'
 'कारण पुरूष आपल्या करिअरवर आंधळ्या एकनिष्ठेनं प्रेम करतात. त्यांना काही सारासार विचारच नसतो.'
 'तुझं तुझ्या मुलावरचं प्रेम इतकं आंधळं आहे की सारासार विचार वगैरेबद्दल बोलायचा तुला काही हक्कच नाही. तुझं बोलणं ऐकून कुणाला वाटायचंही नाही की बिछू तेवीस वर्षांचा पुरुष आहे. तो स्वत:ची काळजी घ्यायला पूर्णपणे समर्थ आहे. अर्थात तसा तू त्याला चान्स दिलास तर.' थोडं थांबून तो म्हणाला, 'तू त्याला असं लहान मुलासारखं वागवून त्याचं नुकसान करतेस असं नाही का तुला वाटत?'
 'मी त्याच्याबद्दल तुझा सल्ला विचारला नव्हता. आणि ह्या एका निरर्थक कॉन्फरन्सला न गेल्यामुळे माझी करिअर धोक्यात येईल असं तू म्हणू शकत नाहीस-'
 'तुला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत त्या निरर्थक असायच्याच.'
 'ओरडू नको.' मी म्हटलं.
 'मला हवं असलं तर ओरडेन. मी काय करावं न काय नाही हे सांगण्याचा तुला काही एक अधिकार नाही. ह्या प्रकाराबद्दल मी तुला नोकरीवरून काढू शकेन, माहीत आहे? आणि ही नाही तर दुसऱ्या छप्पन नोकऱ्या मिळतील असं म्हणू नको. अशी नोकरी तुला शंभर वर्षं शोधून सापडायची नाही.'
 त्याचं म्हणणं खरं होतं. ह्या नोकरीत अगदी मला हवं ते काम माझ्या मनाप्रमाणं करण्याची संधी मिळत होती. तीही त्याच्या सारख्याच्या हाताखाली. माझी संशोधनातली पात्रता ओळखून कारभारविषयक कामाचा बाजा माझ्यावर शक्य तितका कमी टाकणारा, माझ्या कामात ढवळाढवळ न करणारा माणूस मला दुसरीकडे कुठं भेटणार होता? तरीसुद्धा हे त्यानं बालून दाखवलेलं, मला वादात हरवण्यासाठी वापरलेलं मला आवडलं नाही. मी म्हटलं. 'मला ब्लॅकमेल करतोयस का?' त्याच्या कपाळावरच्या फुगलेल्या शिरा एकदम खाली बसल्या. डोळ्यांतल्या रागाची जागा वेदनेनं

कमळाची पानं । ४७