पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "पण त्यासाठी कलकत्त्याला कशाला जायला पाहिजे? मुंबईत काय नोकऱ्या नाहीत?"
 "असतील, पण मला जरा हवापालट पाहिजे आहे. ह्या शहराचा अगदी वीट आलाय मला. हे आहे पक्कं व्यापारी शहर, आणि खऱ्या संस्कृतीचा लवलेशही नसताना जणू आपणच संस्कृतीचे रक्षक आहोत असा आव आणतात इथले लोक!"
 "कलकत्ता काही वेगळं आहे वाटतं?" मी विचारलं.
 "आहे असं ऐकलंय मी. खरंच डोळ्यांनीच पाहीन आता."
 त्याच्या मुंबईबद्दलच्या उद्गारांतून वाजवीपेक्षा जरा जास्तच राग व्यक्त झाला होता. तो राग जणू काय खरा आमच्यावरच होता, अशा आवेशात तो बोलला. सबंध संध्याकाळभरच मग तो काहीसा त्रासल्यासारखा, रुष्ट झाल्यासारखा वागला. नेहमीसारखा आत्मविश्वासानं, आक्रमकपणे बोलत वागत नव्हता. अस्वस्थ, चित्त थाऱ्यावर नसल्यासारखा, काहीतरी हरवल्यासारखा वाटत होता. असं मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. त्यादिवशी तो फार वेळ थांबलाच नाही, आणि निरोप घेताना त्याला फार वाईट वाटत होतंसं दिसलं.
 "बरंय, पुन्हा भेटू लवकरच-" तो म्हणाला. "तुम्ही पोरांनी माझ्यासाठी खूप काही केलंत. पण मी तुमच्या आयुष्यात बांडगूळ होऊन राहणं बरं नव्हे, नाही का?"
 "असं का म्हणतोस? तुझ्याशिवाय करमणार नाही आम्हाला." नरेंद्र म्हणाला.
 शेखर अस्पष्टसा हसला. "मला पण तुमची खूप आठवण होईल. आणि लिलूच्या हातच्या जेवणाचीही. बरं पत्र लिहायला विसरू नका. हा पत्र लिहिण्याच्या बाबतीत महाआळशी आहे लिलू, पण तू लिहिशील ना?"
 "हो तर-" मी म्हटलं.
 मला वाटलं तेवढी शेखरची आठवण झाली नाही. फक्त अधूनमधून मनात येतं, शेखर माझ्यामुळे दूर झाला का? कदाचित् माझ्याबद्दल वाटणाऱ्या ओढीचं खरं स्वरूप त्याला एकदम कळलं असेल, आणि त्याच्या परिणामापासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यानं माझ्यापासून लांब जायचं ठरवलं असेल. त्याखेरीज त्याचं त्या दिवशीचं विचित्र वागणं, निरोप घेतेवेळचं त्याचं करूण स्मित, ह्याची संगती कशी लावायची?

कमळाची पानं । ३७