पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आला की मी प्रथम स्वैपाकघरात जाऊन शेखरला आवडेल असं काय शिजवता येईल ते पाहात असे. तो आमच्याकडे इतक्यांदा जेवला होता की नरेंद्र इतक्याच त्याच्याही आवडीनिवडी मला पाठ झाल्या होत्या. मग जेवणाची वेळ झाली म्हणजे अगदी सहजगत्या विचारल्यासारखं मी म्हणायची, " "जेवायला थांबतोस ना? तसं काही विशेष केलं नाही आज, पण जे आहे तीच मीठभाकरी." ही मीठभाकरी म्हणजे मोठ्या परिश्रमाने रांधलेले याच्या आवडीचे निवडक पदार्थ असत.
 शेखर यायचा असेल त्या दिवशी मी पोषाखही अगदी काळजीपूर्वक करीत असे. म्हणजे अगदी ठेवणीतले किंवा भडक कपडे करीत असे असं नाही. फक्त मला विशेष शोभणारा रंग, किंवा मंद सुगंध येईल इतपत अत्तर, किंवा एखादाच फारसा ठळक नसलेला दागिना. मी काय घातलंय ह्याच्याकडे शेखरचं कधीच लक्ष नसे, पण असं काही केलं की मी विशेष सुंदर दिसत्येय असं माझं मलाच वाटायचं. त्याच्यासमोर तसं वाटायची जरूर भासायची.
 माझ्यात बदल झाला तसा शेखरच्यात झाला की नाही हे मला कळलं नाही. जाण्यापूर्वी तो माझ्याशी जास्त मोकळेपणाने वागायला लागला होता एवढं मात्र खरं. त्यानं माझा 'स्वीकार' केला होता असं म्हणायला हरकत नाही. प्रथमप्रथम आमच्यात एक प्रकारचा ताण असायचा, एकमेकांवर मात करण्याची चढाओढ असायची. आता त्यानं माझं अस्तित्व स्वीकारलं होतं. तो आपणहून मला त्यांच्या गप्पात ओढायचा, कशाबद्दल तरी माझं मुद्दाम मत विचारायचा. एकंदरीतच तो स्त्रीद्वेष्टा असला तरी (आणि त्याचं स्त्रियांबद्दलचं वाईट मत वेळी-अवेळी ठामपणे मांडायला तो मागंपुढं पाहात नसे.) त्याच्या रोषाच्या कक्षेत मी येत नाही, इतर बायकांहून वेगळं असं माझ्यात काही आहे, असं त्याच्या वागण्यातून ध्वनित होत असे. ह्या अप्रत्यक्ष प्रशस्तीवरसुद्धा मी खूष होते.
 मला शेखरबद्दल जे वाटत होतं ते कधी व्यक्त झालं नाही. व्यक्त करावंसं विशेष उमाळ्याने मला कधी वाटलं नाही, कारण मग काय वाटत हात त्याचं नेमकं स्वरूप ठरवावं लागलं असतं. आणि तशी कधी संधीही आली नाही. आम्ही दोघे एकत्र कधी येत नसू. एखाद्या वेळी आलोच तरी नरेंद्र थोड्याच वेळात येणार असे म्हणजे ते काही क्षण धरण्यासारखे नसतच. कधीकधी नरेंद्र नसताना शेखर आलाय अशी कल्पना मी रंगवीत असे पण

कमळाची पानं । ३५