पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नरेंद्रने सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला शेखरचं कार्ड वाचून दाखवलं- इतकी महत्त्वाची बातमी सांगायला चांगलं पत्र लिहायचं सोडून चार ओळी खरडून पोस्टकार्ड पाठवणं हे शेखरच करू जाणे-तेव्हा माझ्यात एकदम वीज सळसळली. माझा उतू जाणारा आनंद नरेंद्रला दिसू नये म्हणून मी काहीतरी सबब काढून उठून गेले त्याच्यासमोरून. त्याला त्याचा आनंद दाबून ठेवण्याचं काही कारण नव्हतं. ह्या बातमीवर विश्वास बसत नसल्यासारखं मान हलवीत तो म्हणाला होता, "गुड ओल्ड शेखर. बी जॉली गुड टु सी हिम अगेन. काय मजा येईल नाही त्याला पुन्हा भेटायला!"
 नरेंद्रचा इंग्रजी ॲक्सेंट अगदी ब्रिटिश धर्तीचा आहे, अन् त्याच्या बोलण्यात अस्सल ब्रिटिश म्हणून समजले जाणारे शब्दप्रयोगही भरपूर असतात. ह्या उलट शेखर त्याच्यापेक्षा किती तरी जास्त वर्षे इंग्लंडमध्ये राहिलेला असूनही त्याचा इंग्रजी ॲक्सेंट अगदी शुद्ध-आक्रमकच म्हटलं तरी चालेल-मराठी आहे. गोऱ्या साहेबाच्या बोलण्याची नक्कल करणं हे नरेंद्रातल्या न्यूनगंडाचं लक्षण आहे म्हणून शेखर नेहमी नरेंद्रची चेष्टा करीत असतो. पण नरेंद्र कधी चिडत नाही. नुसता हसतो आणि आपलं ते घट्ट धरून बसतो. हा नरेंद्रचा एक मला आवडणारा स्वभावविशेष.
 आज मला नरेंद्रचा हेवा वाटला, कारण त्याला होणाऱ्या आनंदाला तो मोकळेपणानं वाट करून देऊ शकत होता. पण मग असंही वाटलं की शेखर आम्हाला दोघांनाही आवडतो न् आमचं तिघांचं इतकं चांगलं जमतं हे बरंच आहे.
 नरेंद्र नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलाय आणि मी आज काय नेसायचं, काय स्वैपाक करायचा हे ठरवण्यात सकाळ घालवली आहे. शेखरला मी इतक्या दिवसांनंतर कशी दिसेन? अजून त्याला माझा स्वैपाक आवडत असेल? खरं म्हणजे इतके काही फार दिवस झाले नाहीत. चारएक महिने असतील. तसा कशात आमूलाग्र बदल घडण्याइतके तर नाहीतच. तरीपण मी स्वत:ला हे प्रश्न विचारते आहे.
 आमच्या लग्नाच्या कंटाळवाण्या रिसेप्शनच्या वेळी शेखर मला प्रथम भेटला. "लिलू, हा माझा सगळ्यात जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र." नरेंद्र ओळख करून देताना म्हणाला. 'जुना' ह्या शब्दावर सवंग कोटी करण्याचा मोह त्यानं टाळला. ह्या एका गोष्टीखेरीज शेखरमध्ये तसं नाव घेण्याजोगं मला काही दिसलं नाही. मला त्या दिवशी भेटलेल्या शेकडो

कमळाची पानं । ३१