उगवायचाय तुला म्हणून हे विष ओकत्येयस. कोणता पुरुष तुझ्याकडे बघणार आहे? अं? कोणापासून मूल होणाराय तुला? डोकं फिरलंय तुझं!
दीना : सीमा शांत हो. कुणी ऐकलं तर काय वाटेल त्याला?
सीमा : हं! मी गप्प बसले म्हणून तिनं केलेलं पाप काही दडून बसणार नाही. ते उजेडात यायचं तेव्हा येणारच. जाते मी. इथं राहण्यात काही अर्थ नाही आता आणि तुला सांगून ठेवते, मुक्ता! माझ्यापासून दूर राहा. माझ्याशी नातं सांगायला येऊ नको. चल पद्मा! आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडलं पाहिजे. इथं क्षणभरही राहाता कामा नये. तिनं बनवलेल्या नरकात कुजत बसू दे तिला स्वत:लाच.
(मुक्ताकडे एकदा घृणायुक्त नजरेनं बघून ती तिरीमिरीनं उजवीकडच्या दारानं बाहेर जाते. पद्माकर खालच्या मानेनं हळूहळू तिच्या मागोमाग जातो. दीनानाथ तिच्याकडे बघतो आहे. त्याच्या नजरेत अनेक छटांचे मिश्रण आहे. आश्चर्य, कुतूहल, कौतुक आणि थोडीशी भीतीसुद्धा. तो काहीतरी म्हणण्यासाठी तोंड उघडतो. मग पुन्हा मिटतो. जरासा घोटाळतो. मग हळूहळू उजव्या दारानं बाहेर निघून जातो. मुक्ताची नजर लांब कुठंतरी लागली आहे. तोंडावर प्रसन्न स्मित आहे.) पडदा.
पूर्व प्रसिध्दि : स्त्री नोव्हेंबर १९७५