पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यावर बाबा मोठमोठ्यानं हसले. म्हणाले, तू स्वत:ची फसवणूक करतो आहेस. तुला तिच्याशी का लग्न करायचं आहे ह्याची फक्त दोन कारणं संभवतात. एक म्हणजे माझ्या इस्टेटीसाठी. त्यावर तो एकदम म्हणाला, छे: छे: तसं काही नाही. बाबा म्हणाले, तर मग उरलं एकच कारण जे लग्नाशिवाय मिळणार नाही अशी तुझी समजूत आहे त्यासाठी तू लग्न करू पाहतोयस. पुन्हा ते हसले नि म्हणाले, पण ते मिळविण्यासाठी तुला लग्न करण्याची जरूरच पडणार नाही. तू तिला विचारून पाहिलंस का? ह्यापुढे त्यानं काही ऐकूनच घेतलं नाही. माझ्याकडे मान वर करूनही न पाहता तो उठून गेला. सभ्यतेच्या त्याच्या मध्यमवर्गीय कल्पनांना इतका मोठा धक्का बसला होता की तो परत माझ्या वाटेला जाण्याची शक्यता उरली नव्हती.
 दीना : इतका क्रूरपणा!
 सीमा : (तिची जिज्ञासा आता जागृत झाली आहे.) पण होता तरी कोण हा?
 मुक्ता : होता असाच अेक कुणीतरी. अेक सामान्य माणूस. बुळा, सगळ्या जगाला भिऊन वागणारा! कशालाच खंबीरपणे तोंड देऊ न शकणारा! बाबांनी त्याला अचूक हेरलं होतं. पण जगातल्या सगळ्या पुरुषांतून माझ्या वाट्याला तोच आला होता न् मला तोच हवा होता. मला तरी तिसरा पर्याय कुठं होता? एक बाबा नाहीतर तो. तो निदान बाबांपेक्षा तरूण होता. जे बाबा नुसतं बोलत ते करायला तरी तो समर्थ होता.
 दीना : (अगदी खालच्या आवाजात) बोलत? काय बोलत?

 मुक्ता : त्यांना सेक्सनं पछाडलं होतं. (मंद हसत) बिचारा दीना! तुझ्या बाबांबद्दलच्या कल्पनेला फार मोठा धक्का देतेय मी, नाही? तुला बाबा आठवतात ते दहा वर्षांपूर्वीचे. ते आता फार बदलले होते. ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते आपलं आयुष्य जगले ती आता शिथिल झाली होती. मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटला होता. शरीराच्या मागण्या पुरवणं हे एकच इंटरेस्ट राहिलं होतं त्यांच्या आयुष्यात. तुला आठवतं ते किती कमी खायचे ते? कशाचा आग्रह केला की फट्दिशी म्हणायचे, मी खाण्याकरता जगत नाही. बरं, थोडं तर थोडं खावं, पण निदान चांगलं झालं असलं तर नावाजून तरी खावं. तेही नाही. खाणं ह्या क्रियेला त्यांच्या लेखी तितकं महत्त्वच नव्हतं. तसंच इतर बाबतीत. एखादवेळी दमून उशिरानं घरी आले न् आईनं पाय चेपू का म्हणून विचारलं तर कधी हो म्हणायचे नाहीत. म्हणायचे, शरीराचे चोचले करू

कमळाची पानं । २३