काहीही करण्याच्या आड तुमचं खानदान येतं. मग काही उद्योग नाही म्हणून तुम्ही दारू पिता आणि आपल्या घराची सुख-शांती घालवून बसता. ह्यातून मार्ग एकच आहे. तो म्हणजे माझ्यापासून फारकत घेऊन तुम्ही घरी जायचं. तुमचे दादा आनंदानं तुमचं स्वागत करतील."
"आणि तू काय करणार?"
"तो मग तुमचा प्रश्न उरणार नाही."
त्यानं बराच वेळ तिच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाला, "तू खरंच म्हणतेयस ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. का म्हणतेयस तेही मला कळत नाही. पण मी तुला सोडून जायचं हा कसलाच मार्ग होऊ शकत नाही. मी तुला सोडणार नाही. मला तू हवीयस."
शेवटी त्याने व्यसनमुक्ती केंद्रात जायचं कबूल केलं. त्यांनी तिला दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली. मधल्या काळात त्याच्या पिण्याला काही धरबंधच राहिला नाही. कधी कधी त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध रहायची नाही. तिने काही म्हटलं की त्यांची भांडणं जुंपायची. शेवटी ज्या दिवशी जायचं त्या दिवशी सकाळी तिने त्याला पुन्हा पुन्हा आठवण केली. "आज संध्याकाळी बसने जायचंय आपल्याला. सकाळी लवकर वेळ दिलीय ती हुकू द्यायची नाही." तो जरा वैतागून म्हणाला, "अग कितीदा सांगशील? येतो म्हटलं ना?"
पण तो आलाच नाही. बसची वेळ हुकली, जेवणाची वेळ सुद्धा टळून गेल्यावर रात्री उशिरा तो आला.
"ए. रडतेस कशाला? कुणी मेलंबिलंय की काय?"
"तुम्ही कबूल केलं होतं. का आला नाही?"
"माझी मर्जी. आणि असल्या कसल्या केंद्रात मला न्यायचे बेत रचू नको. मी येणार नाही. आयला, येवढं सुद्धा स्वातंत्र्य नाही आम्हाला? तू बस म्हटलं की बसायचं, ऊठ म्हटलं की उठायचं असलाच नवरा पायजे होता तर माझ्याशी लग्न कशाला केलं?
"चूक केली म्हटलं ना. आता ती दुरुस्त करते." ती उठून स्वैपाकघराकडे चालायला लागली.
"काय करणारेस?"
"स्वत:ला पेटवून घेते. म्हणजे तुम्हीही सुटाल नि मीही."
"घे. घे. तेवढी कटकट तरी मिटेल माझ्यामागची. माझ्यासारख्याशी लग्न
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/173
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १७३