पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिच्या सर्वांगातून शिरशिरून गेली. तिच्यासाठी त्यानं पसरलेल्या हातांमध्ये ती सहज शिरली.
 आणि मग अचानक त्याच्या अस्नात शरीराचा वेढून टाकणारा उग्र दर्प, त्याच्या हातांच्या दृढ मिठीतून जाणवणारा अधिकार यांच्याविरुद्ध झुंजावंसं वाटलं तिला. गुदमरवून टाकणाऱ्या त्याच्या त्या जवळपणाला तिनं दूर ढकललं. त्याच्या हातांनी तिला इतक्या सहजपणे मुक्त केलं की तिला आश्चर्य वाटलं.
 स्वत:च्या आवाजावर काबू मिळवण्यासाठी तिनं एक दीर्घ श्वास घेतला. ती कोरडी, उष्ण हवा तिच्या नाकपुड्यांना दुखावून गेली.
 "गुड नाईट, विल!" ती म्हणाली.
 "गुड नाईट!"
 तो तिच्यावर रागावलाय की तिला हसतोय हे पाहायला ती थांबलीच नाही. तिला पर्वा नव्हती कशाचीच.
 'लिटल साहेबाची लेक' कशी उपजते हे तिला एकदम उमगलं होतं. ती झोपायच्या खोलीत परत आली तेव्हा प्रताप निजायच्या तयारीत होता.
 "विलच्या खोलीत पाण्याचा तांब्या ठेवला का कुणी?' तो म्हणाला.
 "तेच करत होते मी आत्ता."
  "छान. मला वाटलं, तू झोपली असशील एव्हाना. मजेत गेला ना दिवस तुझा?"
 "बरा गेला. तुला माहीत आहे का, विलला हिराबाईनं झपाटून टाकलंय."
 प्रताप हसला. "ज्याची त्याची आवड असते," तो म्हणाला.
 त्याच्या परिचित, सरळसाध्या बाहूंमध्ये तिनं स्वत:ला निमूटपणे सामावलं.
 "आ:! आज थकून गेलोय मी," तो म्हणाला. "दोनशे पेट्या द्राक्षं रवाना केली आज आपण. आणि अजून तितकीच तरी शिल्लक आहेत उद्याच्या तोडणीसाठी."
 "वा:!" अंधारात थोडीशी हसून ती म्हणाली.

पूर्व प्रसिध्दि : स्त्री नोव्हेंबर १९७४
अनुवाद : आशा मुंडले



कमळाची पानं । १७