पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळ्यांच्या संमतीने लग्न झालं असतं तर असं छान आटोपशीर झालं नसतं.
  भाड्याच्या छोट्याशा घरात त्यांनी संसार थाटला. अनुजाला वाटलं हे किती छान झालं. तसं पाहिलं तर त्याच्या दादांनी उपकारच केले म्हणायचे. त्यांच्या घरात नांदायचं म्हणजे माझी काय गत झाली असती कुणास ठाऊक. इथे आमचे आम्ही मुख्यत्यार आहोत. पण हे ती रणजितला म्हणाली नाही. कुठेतरी तिला वाटत होतं की त्याला ते आवडणार नाही. तो धरून चालला होता की आज ना उद्या दादा-वहिनी हे लग्न स्वीकारतील आणि मग आपण परत घरी जाऊ. अनुजाला तसं वाटत नव्हतं कारण प्रश्न फक्त त्यानं त्यांच्या इच्छेविरूद्ध लग्न केलं ह्याचा नव्हता. पण ह्या विषयावर स्पष्ट बोलणं शक्य नव्हतं. त्याचं कुटुंब हा त्या दोघांच्या नात्यातला दुखरा कोपरा राहाणार होता."
 एक दिवस तिनं विचारलं, "मी पुन्हा कॉलेजात जाऊ का?"
 "कशाला?"
 "बाबा आजारी पडले तेव्हा कॉलेज सुटलं ते सुटलं. एकच वर्ष राहिलं होतं. तेवढं पुरं केलं तर बी.ए. तरी पदरात पडेल."
 "बी.ए. पदरात घेऊन काय करणार?"
 "अमुकच करणार असं नाही. फक्त डिग्री पुरी केल्याचं समाधान आणि नाही तरी तुम्ही दिवसभर बाहेर असता तेव्हा मला काय उद्योग असतो? मी अभ्यास तरी करीन त्या वेळात."
 "तुला हवं तर कर की. माझं काही म्हणणं नाही."
 "फी-पुस्तकांचा खर्च होईल."
 "त्याची तू काळजी करू नको."
 "सकाळीच तास असतात, तेव्हा घरकामाची आबाळ व्हायची नाही."
 तो हसला. "कर म्हटलं ना, मग एवढं का रामायण रचतेयस? मला आपलं वाटलं पदरात बी.ए. ऐवजी एखादं मूल बरं."
 ती पण हसली. "ह्याऐवजी ते कशाला? दोन्ही होऊ देत की."
 तिच्या मनात होतं कदाचित बी.ए. झाल्यावर पुढे काही शिकता येईल, एखादी नोकरी करता येईल. नुसतं घरकाम, स्वैपाक, मूल ह्यांत काही सबंध आयुष्य घालवायचं नाही.
 एक दिवस कॉलेजात जादा तास होते म्हणून ती दुपारी परत गेली होती. परत यायला जरा उशीर झाला म्हणून ती घाईघाईने स्वैपाकाला लागली.

कमळाची पानं । १६७