पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "असं तू आत्ता म्हणतेयस."
 अनुजा हसायला लागली. "तुझा माझ्यावर एवढा विश्वास नाही? आई, खिंडीत गाठून अडवणूक करणाऱ्याशी मी लग्न करणार नाही."
 अनुजाच्या आईची संमती मिळाली, पण रणजितला मात्र धक्का बसला. दादा आणि वहिनी थोडाफार विरोध करणारच हे तो धरूनच चालला होता, पण शेवटी ते त्याच्या मनासारखं करतील अशी त्याला खात्री होती. आईवडिलांच्या मागे लाडाकोडाने वाढवलेला धाकटा भाऊ, त्याला कशालाच कुणी नाही म्हणालं नव्हतं. पण आता मात्र तो मर्यादा सोडीत होता. दादांनी त्याला निक्षूनच सांगितलं, ह्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकणार नाही. हिच्याशी लग्न करायचं तर तुझं तू बघ. आम्ही लग्न करून देणार नाही. त्यानं परोपरीने सांगितलं, "तुम्ही तिला एकदा भेटा तरी."
 "कशाला? जिच्याशी काही संबंध ठेवायचा नाही तिला भेटायचं कशाला?"
 रणजितला स्वत:च्या मर्जीनुसार आयुष्य जगायची इतकी सवय झाली होती की आपल्या निर्णयाला इतक्या अटीतटीने विरोध होईल ह्याची कल्पना आली नाही. त्याच्या भावाला वाटलं होतं की इतक्या सक्त विरोधानंतर तो बहुधा पड खाईल. पण ह्याउलट रणजित बिथरून आणखीच हट्टाला पेटला. अनुजानं पाहिलं की तो काहीही झालं तरी माघार घेणार नाही असं म्हणत होता तरी तो अस्वस्थ होता.
 ती म्हणाली, "रणजित, घरच्यांच्या मर्जीविरूद्ध केलेलं लग्न निभावून नेता येईल की नाही ह्याची तुम्हाला शंका वाटत असली तर मी समजू शकते." तर तो तिच्यावरच भडकला. "तुला काय वाटतं मी इतका कमकुवत आहे? म्हणजे तुला मी नीट समजलोच नाही म्हण. तुलाच भीती वाटत का?"
 "मला कशाची भीती वाटायची? मी तुम्हाला कशाही परिस्थितीत साथ द्यायला तयार आहे."
 "झालं तर मग."
 लग्न रजिस्ट्रारच्या कचेरीत झालं. देणं नाही, घेणं नाही, धार्मिक विधी नाहीत, जेवणावळी नाहीत. एकमेकांच्या गळ्यात हार घालून रजिस्टर सह्या. वहिनीने गपचूप कुणाच्या हाती पाठवून दिलेले मंगळसूत्र त्यानं तिच्या गळ्यात बांधले. सोहळ्यासाठी हजर होते फक्त तिचे आई-भाऊ, शिल्पा, रणजितचे दोन मित्र. अनुजाला हे सगळं आवडून गेलं. तिच्या मनात आलं,

कमळाची पानं । १६६