तो जे म्हणत होता त्याने ती सुखावली होती. तरी ती म्हणाली, "तेवढं पुरे आहे का लग्न करायला? तुम्ही घरच्यांशी बोलला का? ते माझ्यासारखी खालच्या जातीची मुलगी सून म्हणून स्वीकारतील का?"
"मला कल्पना आहे त्यांचा विरोध होईल म्हणून, पण माझा निश्चय आहे म्हटल्यावर त्यांना स्वीकारावंच लागेल."
"तुम्ही आधी त्यांच्याशी बोला, मग आपण ठरवू काय ते."
"बोलेन ग आता. पण तुझी पसंती विचारायच्या आधीच कसं बोलणार? मग तुला मान्य आहे असं धरायचं ना?"
"हो."
"मग मी तुला एक सांगतो त्यांची संमती मिळो न मिळो, माझा विचार पक्का आहे."
"मलाही आईला विचारावं लागेल."
"ती नाही म्हणाली तर?"
"तरी काही फरक पडणार नाही. पण मलाच विचार करायला वेळ द्या."
शिल्पा म्हणाली, "चक्क त्यानं तुला लग्नाबद्दल विचारलं?"
"मग काय सांगतेय?"
"विश्वास बसायला कठीण जातंय. तर तू काय ठरवलंस?"
"तुला काय वाटतं?"
"प्रश्न माझ्या वाटण्याचा नाही, तुझ्या वाटण्याचा आहे."
"सगळं फार कठीण जाणार आहे हे दिसतंच आहे. पण आणलेल्या कुणाशीही लग्न केलं तरी बाईपढे समस्या असतातच. मग कुणीतरी आणलेल्या ओळखदेख नसलेल्या स्थळाशी लग्न करण्यापेक्षा हे काय वाईट आहे?"
अनुजाच्या आईने, एकदा पहिला धक्का पचवल्यावर मग फारसा विरोध केला नाही. तिला दोनच शंका होत्या. एक म्हणजे त्याच्या घरचे तिला कसं वागवतील ही. आणि दुसरी म्हणजे खर्चाबद्दल. त्यांच्या ऐपतीप्रमाणे खर्च करायला, हुंडा द्यायला आपल्याला कसं जमेल?
"आई तू त्याची काळजी करू नको. रणजित म्हणाले ते तुला खर्चात पाडणार नाहीत."
"बघ बाई, पुष्कळजण आधी असं म्हणतात, मग आयत्या वेळी मागण्या करायला लागतात आईबापांच्या मागे लपून."
"तसं केलं तर मी शेवटच्या क्षणी सुद्धा लग्न मोडू शकते."
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/165
Jump to navigation
Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १६५
