जीव कानकोंडा झाला कुणी बघेल म्हणून. तो बोलत होता, तिला काही विचारीत होता, पण तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच लागेना. नजर भिरभिरत होती ओळखीचं कुणी दिसतंय का म्हणून. शेवटी ती म्हणाली, जा आता तुम्ही, आमचं घर जवळच आहे. तो म्हणाला, तू इतकी घाबरतेस का? कोण काय म्हणणार आहे? ती म्हणाली, तुमची गोष्ट वेगळी आहे. मला समाजाची, कोण काय म्हणेल ह्याची काळजी करावी लागते.
हे नियमित व्हायला लागल्यावर मात्र ती विचार करायला लागली. ह्याला माझ्याकडून काय पाहिजे आहे? तिची मैत्रीण शिल्पा म्हणाली, "अशा माणसाला दुसरं काय पाहिजे असतं?"
"नाही ग, तो तसा वाटत नाही."
"अनू, भोळेपणा तरी किती करशील? गावात चार माणसं त्याच्याबद्दल काय बोलतात ते ऐक जरा. कॉलेजात असल्यापासून पोरींना फिरवायची सवयच आहे त्याची."
"तसं काय ग, एखादा जरा मोकळ्या स्वभावाचा असला, एखाद्या मुलीशी नुसता बोलला तरी त्याच्याबद्दल वावड्या उठतात. माझ्याशी त्याचं वागणं आहे त्यात तक्रारीला कुठेच जागा नाही. कधी त्यानं मुद्दाम सलगी करायचा प्रयत्न केला नाही की चुकून झाला असं दाखवून स्पर्श केला नाही. मी घरापासून पुष्कळ अंतरावर त्याला माघारी फिरायला लावते तर तो मुकाट जातो."
"पण मग हवंय काय त्याला? नुसती तुझी कंपनी?"
ह्या प्रश्नाचं उत्तर तिला लवकरच मिळालं. तो म्हणाला, "रविवारी दुकान बंद असतं तेव्हा संध्याकाळी हरणाच्या माळावर भेटशील का?"
तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि काहीच न बोलता खाली मान घालून चालत राहिली.
"काय? भेटशील?"
"कशाला?"
"काही बोलायचंय तुझ्याशी."
"तिच्या तोंडावर आलं होतं, मग आत्ता बोला की, पण तोच पुन्हा म्हणाला, 'आपण किती थोडा वेळ भेटतो, तेवढ्यात बोलता येणार नाही. प्लीज."
"ठीक आहे."
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/163
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १६३