पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "मी कधी पाह्यलंच नव्हतं."
 ती नुसतीच हसली. त्याला तिचं हसणं एकदम आवडलं. काही हातचं न राखता तोंड भरून ती हसायची. इतर मुली कशा ओठ जेमतेम विलग करून किंवा त्यांना जराशी मुरड घालून अर्धवट हसतात. आणि त्याच वेळी डोळ्यांच्या कोपऱ्यांतून तुमच्याकडे पाहात असतात, त्यांच्या हसण्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो ते जोखत. तसं हिचं नव्हतं. ती हसायची म्हणजे हसायची. तिला हसावंसं वाटतं म्हणून. तुमच्याकडे बघून हसावंसं वाटतं म्हणून. त्याच्या बदल्यात तुमच्याकडून अपेक्षा फक्त तसल्याच एका मोकळ्या स्मिताची. ती तुमच्या डोळ्यांत कौतुक, अभिलाषा असं काही शोधत नसे. अर्थात हार्डवेअर स्टोअरच्या काउंटरमागे उभे राहून असले नखरे शक्यच नव्हते, पण तरी त्याला तिचं अप्रूप वाटलं. कॉलेजच्या दिवसांत त्याला भेटायच्या त्या मुलींपेक्षा वेगळंच पाणी होतं हे.
 अनुजाच्या वडिलांचं लोहारकामाचं वर्कशॉप होतं. त्यांच्या बापाची आणि आज्याची कुशल कारागीर म्हणून ख्याती होती. संस्थानच्या दिवसांत घोड्यांना नाल मारायची त्यांची खासियत होती. पंचक्रोशीतून बैलगाडीच्या धावा बसवायला, शेतीची हत्यारं बनवायला, शेवटायला शेतकरी त्यांच्याकडे येत. अनुजाच्या वडिलांनी तर काम खूप वाढलं म्हणून एक वर्कशॉपच थाटलं, चार-पाच कामगार ठेवले. सगळं उत्तम चाललेलं असताना एकाएकी त्यांना हार्ट अटॅक आला आणि चालत्या गाड्याला खीळ बसायची पाळी आली. आजारात खर्च खूप झाला, डोक्यावर कर्ज झालं. अनुजा कामगारांच्या मदतीने जिद्दीने काम चालवीत होती. संसाराला तेवढाच आधार होता. वडील घरी आल्यावर त्यांना पूर्वीसारखं काम झेपणार नव्हतं. अनुजा म्हणाली, "बाबा, तुम्ही नुसतं बसून देखरेख करा, मी सगळं बघते." पण त्यांना ते पटत नव्हतं शेवटी बराच विचार करून त्यांनी वर्कशॉप विकलं आणि एक हार्डवेअरचं दुकान टाकलं. त्यात सुद्धा अनुजाच्या मदतीची गरज होतीच. तिला कॉलेज सोडावं लागलं म्हणून त्यांना वाईट वाटत होतं, पण इलाजच नव्हता. मुलगा लहान होता. तो हाताशी येईपर्यंत बरीच वर्षं जायची होती. दुकान चांगलं चालायला लागलं आणि आपली तब्येत जरा सुधारली की तिला परत कॉलेजला पाठवू असं त्यांनी ठरवलं. पण दुकानाचा जम बसून बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागेस्तोवर दुसरा हार्ट अटॅक येऊन ते गेले. आता घरदार सावरायला अनुजा एकटीच होती.

कमळाची पानं । १६१