पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भेट झाली तर आनंद होईल. तशी शक्यता असेल तर खालील नंबरावर फोन करून माझ्या भावाकडे निरोप ठेव,"
 तेच गोलगोल अक्षर, त्याच लकबी दशकांपूर्वीच्या. पत्र बघून एकदम ती डोळ्यांसमोर उभी राहिली. गोरी, ठेंगण्यातच जमा होणारी, मुरुमं असलेले गोबरे गाल. जरासा बसका आवाज, अखंड बडबड आणि त्यात मधूनच स्वल्पविरामासारखं हसणं. खूप आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या कँटीनमधे कॉफी पीत ऑफ तास काढणं, भटकणं, आमच्या गच्चीवर चांदण्यात बसून तासन्-तास चाललेल्या गप्पा. लग्नाच्या दिवशी जाताना मला मिठी मारून म्हणाली, "तुला जाणीव सुद्धा नाही इतकं काही तू मला दिलंयस. मला विसरू नको." मी रडत रडत म्हणाले होते, "मी कसली विसरतेय? आता तूच मला विसरशील."
 काही वर्ष कॉलेजात लेक्चरर म्हणून काम करून केंद्र सरकारच्या प्रज्ञाशोध प्रकल्पात तिला नोकरी मिळाली होती. त्यावेळी एकदा पुण्याला आलेली असताना ती आईला भेटायला आली. योगायोगाने त्याचवेळी मी आईकडे होते तेव्हा विमलाची आणि माझी भेट झाली. खुशीत दिसली. आपल्या कामाबद्दल उत्साहाने बोलत होती. पण घाईतच होती. मी म्हटलं "पुन्हा पुण्याला आलीस तर आणखी एखादा दिवस खर्चून माझ्याकडे ये ना. जरा निवांत भेटू-बोलू." तिनं नक्की यायचं कबूल केलं, पण भेट कधी झाली नाही. खरं म्हणजे मी तशी अपेक्षाही केली नाही. कारण जी झाली त्या भेटीत, विशिष्ट परिस्थितीत जुळलेलं आमचं नातं विरून गेलेलं मला जाणवलं होतं. आम्ही आमच्या भिन्न मार्गांनी बरीच वाटचाल केली होती. ते मार्ग जाता एकमेकांना छेदण्याची फारशी शक्यता उरली नव्हती. त्यातून ती अमेरिकेत स्थायिक झाली असं कळल्यावर तर उरलासुरला धागा तुटलाच. तो आता इतका काळ गेल्यानंतर पुन्हा सांधण्याचा प्रयत्न ती करीत होती?
 तिच्या भावाकडे ठेवलेल्या निरोपानुसार तिने मला फोन केला. आवाज तसाच उच्चारही तसेच. उच्चारावर अमेरिकन छाप अजिबात नाही.
 "तुझ्याकडे नेमकं कसं यायचं ते सांग."
 "पुण्याला उतरलीस की स्टेशनवरून बस स्टँडवर जा. तिथून जवळच आहे."
 "बस? ते बसबिस मला नाही जमायचं."
 "का? रोज हजारो माणसं बसने प्रवास करतात. चौकशी खिडकीशी

कमळाची पानं । १५१