तिचं डोकं दुखत होतं आणि डोळे जळजळत होते. झाडाच्या थंड सावलीत तिला झोप लागली.
तिला जाग आली तेव्हा लेविन तिच्याजवळ बसला होता.
"किती वेळ झाला तुला येऊन? मला उठवलं का नाहीस?" ती म्हणाली. आपण झोपल्यावर त्यानं पाहात राहावं हे तिला आवडलं नाही.
"इतक्या बेजबाबदारपणे वागल्यावर मी निदान थोडीबहुत विश्रांती तरी तुझं देणं लागतो, असं वाटलं मला. आता बरं वाटतं का?"
"हो. आता छान आहे मी. उकाडा आणि ऊन यांचा तुला नाही त्रास होत?"
"विशेष नाही." आता तो जवळजवळ जांभळट तांबडा दिसत होता.
"मिरवणूक संपली?"
"हो. मी पाहिलं तुला झोप लागलीय म्हणून मी परत गेलो आणि शेवटपर्यंत सगळं पाहात राहिलो." तो हसला. एखादं काम मनासारखं केल्यावरचं समाधान त्याच्या तोंडावर होतं.
बराच वेळ झोपल्यावर ती सुस्तावली होती. आपला दिवस वाया गेला, निदान कसातरीच ताणला गेला याची पण सुस्ती होती ती.
"घरी जायचं ना आपण?" तिनं विचारलं.
"मी थोडी केळी आणि चहा आणलाय."
"झक्क! ग्लास कसे आणता आले तुला?"
"मी विकत घेतले ते."
तिला हसू आवरलं नाही. "बहुतेक त्यांनी ग्लासांची चौपटीनं किंमत वसूल केली असेल."
"काही हरकत नाही."
त्यांनी त्या कोमट झालेल्या चहाचे घुटके घ्यायला सुरुवात केली, आणि पाचसहा केळी फस्त केली.
"उद्या जाणार तू?"तिनं विचारलं.
"हो."
"मला वाटतं, पुन्हा आपली गाठ पडणार नाही. तुला दाखविण्यासारखा अजून एखादा विशेष उत्सव नाही आमच्याकडं ."
"मला तुझे आभार मानायचेत," तिच्या बोलण्यातल्या गर्भित प्रश्नाला उत्तर न देताच तो म्हणाला, "तुझी मदत आणि तुमचं आतिथ्य यांबद्दल."