पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विमला मात्र एखाद्या वेळी आई स्वैपाकघरात असली तर जाऊन तिथे ठाण मांडून गप्पा मारायची. आमच्याकडे स्वैपाकाला बाई होती पण एखाद्या वेळी काहीतरी खास करून बघायची आईला हौस होती. विमल आईनं केलेला कुठलाही पदार्थ नावाजून खायची. फारसा चांगला झाला नसला तरी. आई म्हणायची, "नाही तर माझी मुलं. कधी चांगलं म्हणतील तर शपथ." माझा भाऊ म्हणायचा, "आम्ही हात मारून खाल्लं म्हणजे ते कौतुकच ना. आणि ती परकी आहे म्हणून बोलून दाखवते. तिच्या आईला ती असं म्हणते का ते विचार." विमला नुसतीच हसायची आणि आई म्हणायची, "पण ती परकी नाहीयेच मुळी." विमला आमच्या घरी किती सहजपणे वावरायची, बोलायची त्याचं मला फार कौतुक वाटे. ती म्हणायची, "तू फार सुदैवी आहेस. आई शिकलेली, तेव्हा तू शिकणार हे गृहीतच धरलं गेलं." विमलाला प्रत्येक पायरीवर संघर्ष करावा लागला. "एम्. ए.चं तर विचारूच नको. अजूनही रोज त्याबद्दल कुरकूर चालते. इतकं शिकण्याची गरज आईलाच काय पण वडलांना सुद्धा कळत नाही. तिच्या मते मी आता लग्न करावं. तिनं स्थळं आणायलाही सुरुवात केलीय. सत्यशीलबद्दल तिला माहीत नाही, नाही तर तिनं माझं पुण्याला येणं बंदच केलं असतं." "का? तिला पसंत नाही?" "तो आमच्या जातीचा नाही. मुळात पंजाबी सुद्धा नाही. पण अगदी महत्त्वाचा आक्षेप म्हणजे असलं प्रेमातबिमात पडून लग्न करणं तिला पटत नाही." "मग तू काय करणार?" "बघू आधी एम्. ए. तर होऊ दे. काही तरी मार्ग निघेल."
 एकदा मी तिच्या घरी गेले होते. तिची आई एक प्रचंड बाई होती. उंच पण जाडजूड. त्यांच्या घरचा सगळा स्वैपाक तुपात असे नि त्यासाठी ती चार गॅलन डबे भरभरून अस्सल तूप पंजाबहून मागवीत असे. माझा तिच्याशी फारसा संवाद साधला नाही कारण तिला इंग्रजी येत नव्हतं आणि मला हिंदी. पण तिच्या आणि विमलाच्या फार काही गप्पा वगैरे चालल्या नव्हत्या. तिचे वडीलही, जेवायला दुपारी आले तेव्हा फारसं काही बोलले नाहीत. मी तर खालमानेनंच वावरत होते आणि गप्प गप्प राहतात होते. विमला आमच्याकडे कशी घरातलीच एक असल्यासारखी वावरायची आणि मी काही बोलतही नव्हते ह्याची मला लाज वाटत होती. परत जाताना विमलाची आई मला म्हणाली. "पुन्हा जरूर ये हं." विमलाला ती म्हणाली, "तुझी मैत्रीण फार लाजरी आहे."

कमळाची पानं । १४९