हे पान प्रमाणित केलेले आहे.
त्याच्या डोळ्याला डोळा देत ती म्हणाली, "तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात काय हवं ते मला कळलं होतं."
त्याला एकदम हसू आलं. हे एखाद्या फार्सिकल नाटकातल्या सेटसारखं झालं. दुय्यम दर्जाच्या हॉटेलची खोली, शंभर रुपयांच्या बदल्यात आत्मसमर्पण करायला आलेली ती आणि तो. तो काय? वखवखलेला? असं खरंच तिला त्याच्या डोळ्यांत दिसलं होतं? त्याचं हसू मावळलं. त्यानं तिला पाठीवर थोपटलं आणि तो म्हणाला. "तुझा काही तरी गैरसमज झालाय. जा आता, सुखानं जा, मलाही निघायला पाहिजे. माझी गाडीची वेळ होत आलीय."
स्रग्धरा नोव्हेंबर १९९९
कमळाची पानं । १४६