पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरीही त्याला त्या मुलीचा राग आला नाही. तिनं आपला बकरा बनवला याबद्दल त्याच्या मनात काही कडवटपणा नव्हता आणि एकूण झालं ते बरंच झालं, असं त्याला वाटलं. तिनं त्याला झिडकारलं असतं, तर तो अपमान तो सहन करू शकला नसता आणि समजा स्वीकारलं असतं तर? हा प्रश्न अनुत्तरित राहिला तेच बरं झालं.
 रात्री त्यानं हॉटेलचं बिल भरलं. पेटी भरून ठेवली. गदमदत होतं म्हणून पंखा लावला. चला, उद्या घरी, तो जरा अनुत्साहानेच स्वत:शी म्हणाला. पण त्याला झोप येईना. त्याचे विचार थांबेनात. आता माझ्या तरी आयुष्यात असा काय मोठा अर्थ आहे? पण म्हणून मी काही हे सगळं सोडून दुसरीकडे कुठे धाव घेत नाही. की मला तेवढी हिम्मत नाही म्हणून मी आपला आहे त्याला चिकटून बसतो? पण हिम्मत असली, तरी मला जे हवं ते दुसरीकडे तरी गवसेलच याची हमी काय? प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलंय ते आयुष्य प्रामाणिकपणे जगावं. त्यातच शहाणपणा आहे.
 सकाळी दारावर टकटक झाली तेव्हा तो दचकून उठला. दार उघडलं तो कालची मुलगी समोर उभी. ती चटकन खोलीत शिरली. त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. हे सगळे लोक असलेच. बांडगुळं नुसती. आता काही झालं तरा मी तिला एक पैसाही देणार नाही. तिचा मित्र मरत असला तरी.
 "कशाला आलीस आता?"
 "मी काल तुमच्याशी खोटं बोलले त्याबद्दल तुमची माफी मागायला. पैसे चोरीला गेले हे खरं. पण माझे वडील काही मला पैसे पाठवणार नाहीत. जरी मी मागितले तरी आणि मी मागणारच नाही. तेव्हा मी तुमचे पैसे परत करू शकणार नाही."
 "ते मी पैसे दिले तेव्हा मला माहीत होतं." तो कोरड्या स्वरात म्हणाला, "मी पत्ता दिला नाही यावरून ते तुला कळायला हवं होतं."
 "खरंच की," ती वरमून म्हणाली. हे खरंच तिच्या डोक्यात आलं नव्हतं?
 "मग आणखी कशाकरता? पुन्हा पैसे मागायला?"
 "नाही." थोडं थांबून ती म्हणाली, "मला कुणाकडून काही फुकट घ्यायला आवडत नाही."
 "मग?"
 "मी कालच थांबले असते पण मला जायची घाई होती."
 "तू काय म्हणत्येयस मला काही समजत नाही."

कमळाची पानं । १४५