पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो म्हणाला, "आता सांग तुझे पैसे कसे चोरीला गेले ते."
  "मी झोपले होते तेव्हा माझ्या बॅगेतनं गेले."
 "पोलिसांकडे तक्रार वगैरे केलीस का?"
 "त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण मी एका धर्मशाळेत राहिले होते. सकाळी पैसे गेल्याचं समजलं तेव्हा तिथं दुसरं कुणीच नव्हतं."
 "तू धर्मशाळेत राहिली होतीस?"
 "त्याला काय झालं?"
 "धर्मशाळा कसल्या घाणेरड्या असतात."
  तिनं खांदे उडवले. "मला नाही त्याचं एवढं काही वाटत."
 "तू अमेरिकन आहेस ना? तुझ्या देशात तर सगळं स्वच्छ, चकाचक असतं. मग तू असं कसं म्हणतेस?"
 "आम्ही सगळ्या चुकीच्या गोष्टींचं अवडंबर माजवतो."
 "स्वच्छता चुकीची आहे?"
 "तसं नाही. स्वच्छता ठीक आहे, पण एक मर्यादेपर्यंत. त्याच कर्मकांड करून ठेवलं, की तुम्ही तुमचं सगळं लक्ष त्याच्याकडेच देता. इतर महान गोष्टींकडे लक्ष द्यायला मग तुम्हाला फुरसत होत नाही."
 त्याच्या मनात आलं, कदाचित हिची आई स्वच्छतेच्या नादापायी आपली आबाळ करते असं हिला वाटलं असेल. पण तो तसं काही म्हणाला नाही फक्त जरा पडेलपणे म्हणाला, "मी याबद्दल अशा तऱ्हेनं विचार केलाच नव्हता."
 ती तीव्रतेने म्हणाली "तेच तर चुकतं. बहुतेक लोक विचार करत नाहीत. एखादी गोष्ट परंपरेनं चालत आलीय ना, मग ती योग्यच असली पाहिजे, असं म्हणून तशीच करीत राहतात मग स्वच्छ, शिक्षित, श्रीमंत सगळ बनण्याची धडपड करता करता त्यांची दमछाक होते. नि मग चांगल माणूस म्हणून समाधानाने जगायला ते विसरतात."
 त्याला तिची गंमत वाटली. एखाद्या शाळकरी मुलाच्या निबंधासारखं ती बोलत होती. पण तरी जीव तोडून बोलत होती. कुठेतरी स्वत:च्या आयुष्यात अनुभवलेल्या वेदनेचा निचरा करीत होती. त्याच्या मनात आलं, मी कशा तऱ्हेचा माणूस आहे असं हिला वाटतं? पण तिच्या विचारांत त्याला थाराच नव्हता.
 तो म्हणाला, "तुझे सगळेच पैसे गेले?"

कमळाची पानं । १४२