पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/141

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा त्याला नवा अनुभव होता. तिनं आपल्या सुकलेल्या, चिरकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि ती म्हणाली, "तुम्ही मला मदत कराल का?'
 ती अगदी हळू, कुजबुजल्यासारखं बोलत होती, दोन हातांवरही कुणाला ऐकू येऊ नये असं.
 तो म्हणाला, "कसली मदत?"
 "मला थोडे पैसे हवे होते. उसने. माझे पैसे चोरीला गेले."
 ती अजून तशीच क्षीण आवाजात बोलत होती. त्याच्या लक्षात आलं, की तिची बोलण्याची पद्धत तशी होती, असं नसून तिचा आवाज फुटतच नव्हता. ती दिसतही होती अशक्तपणामुळे ग्लानी आल्यासारखी.
 त्यानं विचारलं, "माझ्याबरोबर येतेस का? इथे पैसे नाहीत माझ्याकडे, हॉटेलमध्ये ठेवलेत."
 ती उभी राहिल्याबरोबर तिचा झोक जायला लागला. त्यानं तिला सावरलं. आणि त्याची टॅक्सी उभी होती तिकडं नेलं. त्याने उघड्या धरलेल्या दारातून ती काही न बोलता टॅक्सीत चढली. त्याच्यामागे बेदरकारपणा होता की ती कसला विचार करण्याच्या पलीकडे गेली होती ते त्याला कळलं नाही.
 हॉटेलच्या लॉबीतून तिला नेताना त्याला वाटतं होतं, की मॅनेजर काही आक्षेप घेईल. पण त्याने खोलीची किल्ली दिली नि तो पुन्हा जाडजूड वहीत नाक खुपसून बसला. खोलीत गेल्यावर त्याने तिला विचारलं, "तुला भूक लागलीय?" तिनं मानेनं हो म्हटलं. त्यानं कॉफी, उपमा मागवला. ट्रे आल्यावर त्यानं कॉफी ओतली ती तिनं घटाघट पिऊन टाकली. उमपा मात्र सावकाश, गिळायला कष्ट होत असल्यासारखी खात होती. तो त्याच्या कॉफीचे घोट घेत एका हाताने माशा मारीत तिच्याकडे पाहात होता. तिच्या जबड्याच्या स्नायूची नाजूक हालचाल होत होती आणि चेहऱ्याच्या कातडीखालचं निळसर रक्तवाहिन्यांचं जाळं अस्पष्ट दिसत होतं. हडकुळे हात, गलिच्छ नखं, फिकट ओठ, मळलेला लुंगी- कुडता, या सगळ्यामुळेच त्याला तिच्याशी जवळीक वाटली. चकचकीत, सुळसुळीत अशा बायकांना तो बिचकायचा.
 तिनं उपमा खाऊन झाल्यावर आणखी एक कप कॉफी घेतली आणि खाली वाकून लुंगीला तोंड पुसलं. मग वर बघून ती त्याच्याकडे पाहन हसली. तिचे दात खूप लहान होते आणि हसताना तिच्या हिरड्या दिसत होत्या पण यावेळी तिच्या हसण्यात जरा जास्त जीव होता आणि ते हसणं तिच्या डोळ्यांतही उमटलं. त्याला वाटलं, तशी छान आहे ही दिसायला.

कमळाची पानं । १४१