निरुपद्रवी असं लेबल चिकटवलं होतं. तो त्यांच्याभोवती कसकसली दिवास्वप्नं गुंफतो हे जर त्यांनी त्याच्या मनात डोकावून पाहिलं असतं, तर त्या त्याच्या जवळपास फिरकल्या नसत्या, या विचारानं त्याची करमणूक होई.
त्याचे विवाहित मित्र जेव्हा त्याला म्हणायचे, "नशीबवान आहेस लेका तु. सापळ्यातनं सुटलास." तेव्हा आपण खरोखरच नशीबवान असल्यासारखं तो स्मितहास्य करी. पण वस्तुस्थिती अशी होती, की त्याचं अविवाहित राहणं हे त्याच्या नियंत्रणापलीकडच्या परिस्थितीने घडवून आणलं होतं. त्याचे आई-वडील तो शाळेत असतानाच वारले होते. त्यानंतर त्याला पाळलं पोसलं ते एका लांबच्या काका-काकूंनी, केवळ आपद्ध़र्म म्हणून. तसं त्यांनी त्याचा छळ केला किंवा त्याला अर्धपोटी ठेवलं असं नाही. त्याचा चांगला सांभाळ केला. पण तो मोठा झाल्यावर त्याच्यासाठी मुली बघून त्याचं लग्न करून देण्यापर्यंत आपलं त्याच्याविषयीचं कर्तव्य आहे असं त्यांनी मानलं नाही. आता आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर जवळजवळ चाळिशीला पोहोचल्यावर कदाचित लग्नाचं जमलंही असतं; पण त्यासाठी खटपट करणं, चार ठिकाणी शब्द टाकणं, मुली बघणं हे त्याच्यानं झालं नसतं. आता एकटं राहण्याची सवय इतकी अंगवळणी पडली होती. की एका सर्वस्वी अनोळखी व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनाची भागीदार करून घ्यायच्या कल्पनेची त्याला धास्ती वाटत होती.
तो विचारात एवढा गढला होता, की ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा तो गोंधळला. खरं म्हणजे ती जागची उठलेली त्यानं पाहिली होती. पण ती आपल्या दिशेने येतेय याची जाणीव त्याला झाली नव्हती. तो तिच्याकडे पाहून किंचितसा हसला. 'हॅलो' म्हणून तिनं ओठ विलग केले, पण ते हसल्यासारखं दिसलंच नाही. ती परदेशी गोऱ्या कातडीची बाई आहे हे पाहून त्याला जरा आश्चर्य वाटलं. तिच्या चेहऱ्याची त्वचा इतकी कोरडी दिसत होती, की तिला बोट लावलं तर तडा जाईल असं वाटत होतं. तिच्या मूळच्या लालसर आता धूळकटलेल्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्याभोवती विखुरल्या होत्या. तिचे डोळे हिरवे होते. नितळ हिरवे. पण नेहमी हिरव्या डोळ्यात जी चमक असते ती त्यात नव्हती. ते तेजहीन, भावहीन होते.
ती उठलेली त्यानं पाहिली. ती त्याच्या दगडावर, त्याच्या शेजारी बसली तेव्हा त्याचं हृदय एकदम धडधडलं. बसमध्ये वगैरे सोडून एखाद्या अनोळखी बाईनं येऊन शेजारी बसणं
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/140
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । १४०