Jump to content

पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोरड्या डोळ्यांनी आणि मनाने हे सगळं बघतात आणि परत घरी गेल्यावर भेटेल त्याला सांगतात, "मी हम्पी पाहिलं. खरंच बघण्यासारखं आहे हं." कुणी तरी असंच सांगितलं म्हणून एका ठिकाणचं काम उरकून परतताना रस्ता वाकडा करून तो इथं आला होता.
 तो सडा होता म्हणून म्हणा किंवा इतरजण अंगाबाहेर टाकायचे म्हणून म्हणा. ऑफिसची बाहेरगावची कामं बरेचदा त्याच्या अंगावर पडायची. त्यालाही ते आवडायचं. प्रवास, नवी ठिकाणं, नवी माणसं आणि अधूनमधून असं एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देणं. पण हे भग्न अवशेष बघून बघून त्याला उदास आणि कोंडल्यासारखं वाटायला लागलं आणि एकदम ती बाई बघून त्याच्या मनावरचं मळभ विखुरलं गेलं. कदाचित ती ज्या तऱ्हेनं त्या पाषाणाला टेकून बसली होती, जणू ती तिथलीच होती आणि कामानं थकून क्षणभर टेकली होती, त्यामुळे असेल, पण एकदम त्याच्या डोळ्यांसमोर एक जिवंत शहर उभं राहिलं. आपल्या कामासाठी किंवा मनोरंजनासाठी लगबगीने इकडे तिकडे जाणाऱ्या, गंभीर चर्चा करणाऱ्या किंवा रिकामटेकडेपणी गप्पा मारणाऱ्या नागरिकांनी गजबजलेलं.
 त्या बाईला दृष्टीच्या टप्प्यात ठेवून तो खाली बसला. कोण असेल ती? अशी एकटीच का बसली असेल? त्याला जवळून कुणी बायका माहीत नव्हत्या म्हणून की काय, त्याचं विचारविश्व खूपसं बायकांनी व्यापलेलं होतं. कुठेही सहज संपर्कात येणाऱ्या बायकांबद्दल तो स्वप्नरंजन करी. त्यात त्या नेहमीच त्याला या ना त्या प्रकाराने वश होत. खऱ्या आयुष्यात मात्र एखादीचं पेन खाली पडलं नि ते त्यानं उचलून दिल्यावर ती मुरकत त्याला थॅंक्यू म्हणाली किंवा एखादी वेंधळेपणाने त्याच्यावर येऊन धडकली, असं कधी घडलं नाही. कधी कधी त्याला इच्छा व्हायची, की गर्दीचा फायदा घेऊन एखादीला निसटता स्पर्श करावा. त्यानं इतर पुरुषांना असं करताना पाहिलं होतं. बहुतेक स्त्रिया मागे वळून एक जळजळीत कटाक्ष टाकायच्या. पण त्याला ते कधी करवलं नाही. त्याच्या मनाचा अडसर होताच. शिवाय एखादीनं चारचौघात तमाशा केला तर काय घ्या ही भीतीही. व्यावसायिक आयुष्यात तसा त्याचा अनेक जणींशी संबंध यायचा. मुख्यतः त्याच्या ऑफिसात काम करणाऱ्या. त्यांच्या पैकी कुणाशीच जवळीक साधणं त्याला कधी जमलं नव्हतं. त्या बिनधास्तपणे त्याच्याशी चेष्टामस्करी करायच्या. थोडासा चावटपणासुद्धा. पण तो जाणून होता की त्यांच्या अशा वागण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्याला

कमळाची पानं । १३९